उद्योगनगरीचे शेतकरी महापौर योजना पूर्ण करणार

उत्तम कुटे
रविवार, 19 मार्च 2017

"वाहतुकीचा जुनी व ज्वलंत समस्या असून त्यासाठी पीएमपीएमएल सक्षम करण्यावर आपला भर राहणार असून त्याअंतर्गत अपूर्ण बीआरटी मार्ग पूर्ण करण्यास प्राधान्य देणार आहे.''
- नितीन काळजे

पिंपरी : 'राष्ट्रवादी'च्या मावळत्या महापौर शकुंतला धराडे यांनी सुरू केलेल्या व अद्याप अपूर्ण असलेल्या विविध योजना मंगळवारी (ता.14) बिनविरोध निवड झालेले भाजपचे पहिले महापौर नितीन काळजे हे पूर्णत्वास नेणार आहेत. गेली कित्येक वर्षे प्रलंबित राहिलेले आणि संपूर्ण शहराला भेडसावणारे रेडझोन, शास्ती कर आणि अनधिकृत बांधकामे या ज्वलंत आणि गंभीर प्रश्‍नांचाही ते पाठपुरावा करणार आहेत. तसेच शहराला जिल्ह्याचा दर्जा आणि स्वतंत्र पोलिस आयुक्तालय करण्याला त्यांचा प्राधान्यक्रम राहणार आहे.अनावश्‍यक कामे आणि पर्यायाने त्यावर होणारा वायफळ खर्च टाळणार असल्याचे सांगताना नियमाला हरताळ फासून शहरात उभारण्यात आलेले व अपघाताला आमंत्रण देणारे गतिरोधक नगरसेवकाच्या सांगण्यानुसार कुठेही आणि कसेही आता उभारले जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नवे महापौर हे स्थानिक व शेतकरी आहेत. नगरसेवकपदाची ही त्यांची दुसरी टर्म आहे. पहिल्या वेळी ते राष्ट्रवादीचे नगरसेवक होते. पालिका निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करून ते पुन्हा निवडून आले आहेत. युवक वर्गासाठी त्यांनी विशेष काम केलेले आहे. महापौरपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या कामांचा प्राधान्यक्रम सांगितला.

झपाट्याने वाढणारी शहराची लोकसंख्या आणि शहराला 24 तास पाणी देण्यासाठी
भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याची योजना पूर्ण करण्याचा पाठपुरावा काळजे
करणार आहेत. त्यातून समाविष्ट गावांना पुरेसे पाणी देण्याचा त्यांचा मानस आहे. सध्याची पिंपरीपर्यंतची मेट्रो निगडीपर्यंत नेण्यासाठीही ते प्रयत्न करणार आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पातून मिळणाऱ्या निधीचा योग्य तिथेच वापर करण्यावर आपला भर आणि लक्ष राहणार असल्याचे नव्या महापौरांनी आवर्जून सांगितले. माजी पालिका आयुक्त डॉ.श्रीकर परदेशी यांनी सुरू केलेली व त्यांच्या काळात अतिशय लोकप्रिय झालेली व सध्या डबघाईस आलेल्या सारथी योजनेला पुन्हा संजीवनी देण्याचा नवनिर्वाचित महापौरांचा मानस आहे.

'वाहतुकीचा जुनी व ज्वलंत समस्या असून त्यासाठी पीएमपीएमएल सक्षम
करण्यावर आपला भर राहणार असून त्याअंतर्गत अपूर्ण बीआरटी मार्ग पूर्ण
करण्यास प्राधान्य देणार आहे''.
- नितीन काळजे

Web Title: pcmc mayor nitin kalje vows to complete schemes