काम होण्यापूर्वीच उद्‌घाटनाची "लगीनघाई' 

संदीप घिसे - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

पिंपरी - आचारसंहिता लागू होण्याच्या भीतीमुळे सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने उद्‌घाटनाचा धडाका लावला. काही ठिकाणी अपूर्ण कामे आहेत, तर काही ठिकाणी घाईघाईत केलेली कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. चिंचवडमधील जिजाऊ पर्यटन केंद्राची पंधरा दिवसांत दुरवस्था झाली. संभाजीनगर आणि पिंपरीतील जलतरण तलाव उद्‌घाटनानंतर अद्यापही बंदच असल्याचे "सकाळ'ने केलेल्या पाहणीत दिसून आले. 

पिंपरी - आचारसंहिता लागू होण्याच्या भीतीमुळे सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने उद्‌घाटनाचा धडाका लावला. काही ठिकाणी अपूर्ण कामे आहेत, तर काही ठिकाणी घाईघाईत केलेली कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. चिंचवडमधील जिजाऊ पर्यटन केंद्राची पंधरा दिवसांत दुरवस्था झाली. संभाजीनगर आणि पिंपरीतील जलतरण तलाव उद्‌घाटनानंतर अद्यापही बंदच असल्याचे "सकाळ'ने केलेल्या पाहणीत दिसून आले. 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते चिंचवडगावातील जिजाऊ पर्यटन केंद्राचे उद्‌घाटन तीन जानेवारी रोजी झाले. अकरा कोटींच्या कामापैकी सात कोटी रुपयांचे काम झाल्याचे सांगण्यात आले. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने अवघ्या 15 दिवसांतच या पर्यटन केंद्रास अवकळा प्राप्त झाली आहे. मात्र उद्‌घाटनाची कोनशिलाही सुरक्षारक्षकांच्या चौकीत ठेवली आहे. झाडांची योग्य काळजी न घेतल्याने झाडे जळून गेली आहेत. काही ठिकाणी उद्यानात रोपण करण्यासाठी आणलेली झाडे अद्यापही प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलेली आहे. 

पर्यटन केंद्रात विविध मूर्ती ठेवण्यासाठी फक्‍त चौथरे उभारण्यात आले. मात्र त्यावर अद्याप मूर्ती ठेवलेल्या नाहीत. उद्यानाच्या हिरवळीवर एक चौकानाकार खड्डा असून, त्याच्यालगत सिमेंट विटांचे काम केले आहे. मात्र, त्यावर झाकण नसल्याने लहान मुले खेळताना अपघात होऊ शकतो. जुन्या पार्वती उद्यानातही तुटलेली खेळणी ठेवण्यात आली असून, त्यामुळे लहान मुलांना दुखापत होऊ शकते. 

पिंपरीतील जलतरण तलावाचे काम 2011 पासून आहे. त्यासाठी आतापर्यंत सुमारे पाच कोटी रुपयांचा खर्च केला आहे. 25 डिसेंबर रोजी या जलतरण तलावाचे उद्‌घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. मात्र, तेव्हापासून जलतरण तलाव अद्याप बंदच आहे. शाहूनगरमधील जलतरण तलावही क्रीडा विभागाकडे हस्तांतरित केलेला नसल्याने उद्‌घाटनानंतरही तो अद्याप बंदच आहे. 

""पिंपरीतील जलतरण तलाव अद्याप क्रीडा विभागाकडे हस्तांतरित केलेला नाही म्हणून तो वापरासाठी बंद आहे. जलतरण तलावामध्ये कोणतेही काम अर्धवट नाहीत.'' 
- प्रमोद ओंबासे, कार्यकारी अभियंता ड प्रभाग 

""नागरिकांना जॉगिंग ट्रॅक व ओपन जीमचा वापर करता यावा, म्हणून पर्यटन केंद्राच्या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन केले आहे. जपून वापर न केल्यामुळे ओपन जिमचे साहित्य तुटले आहे.'' 
- देवन्ना गट्टूवार, कार्यकारी अभियंता-ब प्रभाग 
 

""संभाजीनगरमधील जलतरण तलावाचे हस्तांतर लवकरच क्रीडा विभागाकडे केले जाणार आहे. मात्र, ते उद्‌घाटनापूर्वी का केले नाही, या बाबत आपणांस माहिती नाही.'' 
- सतीश इंगळे, कार्यकारी अभियंता- फ प्रभाग 
 

जिजाऊ पर्यटन केंद्रातील स्थिती 
* वन्यप्राण्यांचे पुतळे सुरक्षारक्षकांच्या चौकीत 
* निकृष्ट दर्जाचे ओपन जिमचे साहित्य तुटले 
* सीमाभिंतीचे काम अपूर्ण, पत्रे लावले 
* ऍम्फी थिएटरच्या पायऱ्यांचे काम सुरू 
* जॉगिंग ट्रॅकच्या फरशा निखळण्याच्या स्थितीत 
* प्लॅस्टिक पाइप, दगड, लोखंडी रॉड साहित्य पडून 

पिंपरी गावातील जलतरण तलाव 
* जलतरण तलावाच्या सीमाभिंतीचे काम सुरूच 
* पेव्हिंग ब्लॉकचेही काम सुरूच 
* इमारतीच्या रंगरंगोटी व इतर काम सुरू 
* राडारोडा व लोखंडी बार परिसरात अस्ताव्यस्त

Web Title: pcmc politics