बंडखोरी मोडली; पण असंतोष कायम

pcmc
pcmc

पिंपरी - महापालिका रणसंग्रामात कोणता सैनिक कोणत्या पक्षाचा याचा अखेरच्या क्षणापर्यंत थांगपत्ता लागला नाही. इतक्‍या गुप्त पद्धतीने सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांचे एबी फॉर्म त्या त्या विभागाच्या निवडणूक अधिकाऱ्यांना शेवटच्या क्षणी सादर केले. राजकीय पक्षांच्या या खेळीमुळे बंडखोरीला काही प्रमाणात चाप बसला असला, तरी पक्षातील खदखद कमालीची वाढली आहे. मतदानाच्या दिवशी ती बाहेर पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांना क्रॉस वोटिंगचा धोका निर्माण झाला आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी शहरातील सर्व म्हणजे 11 निवडणूक कार्यालयांवर उमेदवार व त्यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी पहावयास मिळाली. भाजप, राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांनी आपली यादी गुलदस्तात ठेवल्याने अधिकृत उमेदवार कोण? याची उत्कंठा अखेरपर्यंत कायम राहिली. बंडखोरी टाळण्यासाठी हा पवित्रा घेतल्याचे पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात होते. त्याचप्रमाणे चांगले उमेदवार पळवापळवीची राष्ट्रवादी व भाजपमध्ये चढाओढ असल्याने, सावध पवित्रा सर्व पक्षांनी घेतला होता. या पवित्र्यामुळे बंडखोरी रोखण्यात राष्ट्रवादी, भाजपला काही प्रमाणात यशही आले. पण आता पक्षांतर्गत रोषाला या पक्षांना सामोरे जावे लागत आहे.

भाजपच्या उमेदवार यादीवर शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचा प्रभाव दिसत आहे. त्याचा विपरीत परिणाम मतदानावर दिसण्याची दाट शक्‍यता आहे. अनेकांचे तिकीट कापल्याने त्यांनी पक्षाविरुद्ध बंडाची भाषा सुरू केली आहे. त्यामुळे अंतर्गत असंतोषाचा सामना करण्याची वेळ राष्ट्रवादी, भाजपवर आली आहे. काही प्रमाणात शिवसेनेतही तीच स्थिती आहे. कॉंग्रेला अनेक ठिकाणी उमेदवारही देता आलेले नाहीत.

सुजाता पालांडेंना भाजपची उमेदवारी
प्रभाग क्रमांक 20 (संत तुकारामनगर)मधून राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सुजाता पालांडे यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी भाजपमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच प्रभागात राखीव जागेवरून जितेंद्र ननावरे यांच्या पत्नीला भाजपने उमेदवारी दिली. ननावरे कालच (गुरुवारी) भाजपमध्ये दाखल झाले आहेत. यशवंत भोसले, कुणाल लांडगे हेदेखील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. विशेष म्हणजे या प्रभागातील भाजपचे चारही उमेदवार काल-परवापर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते. त्यामुळे येथे मूळ भाजपचा उमेदवार कोण, असा प्रश्‍न मतदार विचारताना दिसत आहेत. एकेकाळी भाजपचे सदाशिव खाडे या भागातून लढले होते.

साहनींचे तिकीट कापल्याने आमदार नाराज
इंद्रायणीनगर (भोसरी) येथील प्रभाग आठमधून भाजपने विलास मडिगेरी, सारंग कामतेकर, सीमा सावळे, नम्रता लोंढे, असे पॅनेल उभे केले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीने माजी आमदार विलास लांडे यांचा मुलगा विक्रांत यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपकडून तीव्र आग्रही असलेले आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक तुषार साहनी यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी ऐनवेळी शिवसेनेतून उमेदवारी मिळविली. या उमेदवारीवरून भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांच्यात मतभेद झाल्याची चर्चा कार्यकर्त्यांत रंगली आहे. त्यामुळे लांडगे समर्थकांतही नाराजीचा सूर दिसत आहे.

संघाच्या आग्रहाला मुरड
प्राधिकरणातील प्रभाग 15 मधून भाजपने अमोल थोरात यांचे तिकीट कापून गेल्यावेळी राष्ट्रवादीतून उमेदवारी लढविलेले अरुण थोरात यांना उमेदवारी बहाल केल्याने भाजप कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी आहे. याठिकाणी भाजपचे आणखी एक इच्छुक बाळा शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. अमोल थोरात यांच्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही आग्रह धरला होता; परंतु शहराध्यक्ष जगताप व खासदार अमर साबळे यांचा त्यास विरोध असल्याने अमोल थोरात यांना दूर ठेवण्यात आले. यामुळे नाराज झालेले थोरात कार्यकर्त्याशी व वरिष्ठांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.

महेश कुलकर्णींनाही डावलले
चिंचवडमधून भाजपचे आणखी एक निष्ठावंत व ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदेश भाजपचे सदस्य महेश कुलकर्णी यांना उमेदवारी नाकारून त्या ठिकाणी राजेंद्र गावडे यांना संधी देण्यात आली आहे. गावडे हे लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक मानले जातात. कुलकर्णी यांना उमेदवारी नाकारल्याने ब्राह्मण समाजात काही अंशी नाराजीचा सूर दिसत आहे. चिंचवडमधून प्रदीप सायकर, दीपक नागरगोजे यांना डावलल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आकुर्डी-मोहननगरच्या प्रभाग 14 मधून भाजपने गणेश लंगोटे यांना डावलून प्रकाश जैन यांना उमेदवारी दिली. या ठिकाणी भाजपने कैलास कुटे, तेजस्विनी दुर्गे, राणी टेकवडे यांना उमेदवारी दिली. याच प्रभागात भाजपकडून सूरज बाबर इच्छुक होते.

सांगवीत शितोळेंची बंडखोरी
राष्ट्रवादी कॉंग्रेसने सांगवीतील प्रभाग 32 मधून विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे यांचे तिकीट कापल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून बंडखोरी केली आहे. या ठिकाणी अतुल शितोळे, पंकज कांबळे, ज्योती ढोरे, सुषमा तनपुरे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत या ठिकाणी असंतोष आहे.

प्रत्येक पक्षांत थोड्याफार फरकाने असंतोष असल्याने, या वेळी मोठ्या प्रमाणावर "क्रॉस वोटिंग' होईल आणि पक्षांना बहुमत मिळविण्यास धडपडावे लागेल हे नक्की!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com