पालिका करणार ‘टॅमिफ्लू’ची खरेदी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

पिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी प्रमाणात होत असून, स्वाइन फ्लूबाधित रुग्णांच्या संख्येत मात्र वाढ होत आहे. त्यांच्या सोयीसाठी औषधे (टॅमिफ्लू), लस व इतर साधनसामग्री तातडीने खरेदी करणे गरजेचे असल्याने ते खरेदी करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.

पिंपरी - महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे, लस व इतर साधनसामग्री यांचा पुरवठा सरकारकडून होतो. सदरचा पुरवठा सध्या कमी प्रमाणात होत असून, स्वाइन फ्लूबाधित रुग्णांच्या संख्येत मात्र वाढ होत आहे. त्यांच्या सोयीसाठी औषधे (टॅमिफ्लू), लस व इतर साधनसामग्री तातडीने खरेदी करणे गरजेचे असल्याने ते खरेदी करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.

शहरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. टॅमिफ्लू गोळ्या, गरोदर माता, गंभीर रुग्ण, स्वाइन फ्लू रुग्णांसाठीच्या वॉर्डातील कर्मचारी, लहान मुले यांच्यासाठी लसीची आवश्‍यकता आहे. त्यामुळे तातडीची बाब म्हणून महापालिकेच्या औषध भांडार विभागाने औषधे व लस उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार लसीचे दीड हजार डोस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे तीन लाख ८७ हजार रुपये खर्च अपेक्षित असून, लस खरेदीची प्रक्रिया महापालिका वैद्यकीय विभागाने सुरू केलेली आहे.

खासगी पुरवठादारांकडून खरेदी 
पालिकेचे शहरातील दवाखाने व रुग्णालयांना ‘टॅमिफ्लू’ गोळ्यांचा पुरवठा करण्यासाठी, त्यांचा साठा उपलब्ध ठेवण्यासाठी आणि रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या सोयीसाठी औषध खरेदीची आवश्‍यकता आहे. नोंदणीकृत असलेले औषध पुरवठादार चिंचवड येथील राशी एंटरप्राइझेस, पुण्यातील रोहित एंटरप्राइझेसकडून पालिका खरेदी करणार आहे. हा विषय मंगळवारच्या (ता. २१) ‘स्थायी’समोर मंजुरीसाठी ठेवला आहे.

स्वाइन फ्लूबाबत जनजागृती केली जात आहे. सध्या महापालिका वैद्यकीय विभागाकडे साडेचार हजार ‘टॅमिफ्लू’ गोळ्या उपलब्ध आहेत. मात्र, तातडीची उपाययोजना म्हणून आणखी गोळ्या व प्रतिबंधात्मक लसींची आवश्‍यकता आहे. 
- डॉ. के. अनिल रॉय, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका 

आकडे बोलतात
‘टॅमिफ्लू’ गोळ्या उपलब्ध - ४५००
तातडीसाठी आवश्‍यकता -    १०,०००
एका पाकिटात गोळ्या - १०
एका पाकिटाची किंमत -     ३९८ रुपये
खरेदीची तयारी - १००० पॅकेट
अपेक्षित खर्च  - ३,९८,००० रुपये

आजार अंगावर काढू नका - डॉ. रॉय
‘‘सर्दी, खोकला, अशी स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष करू नका. कोणताही आजार अंगावर काढू नका, डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या,’’ असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.  

शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळल्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत, असे सांगून डॉ. रॉय म्हणाले, की स्वाइन फ्लूच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक औषधांचा भरपूर साठा ठेवणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. भित्तिपत्रके, हॅण्डबिलच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. महापालिकेचे रुग्णालये व दवाखान्यांमधील डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र बेडची व्यवस्था करण्याची सूचना खासगी डॉक्‍टरांना केली आहे. शाळा, महाविद्यालये, नगरसेवक, सोसायट्या, गणेश मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळ यांच्यासमवेत बैठका घेऊन माहिती दिली जात आहे. सर्दी, खोकला असल्यास विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती करू नका. अशा विद्यार्थ्यांना घरी राहण्यास परवानगी द्या, अशा सूचना महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागांना, शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांना दिल्या आहेत.

Web Title: PCMC will buy Tamiflu