पुण्यात शांततेचे वातावरण; 'ईद ए मिलाद'मुळे आजही पोलिस बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

पुणे : अयोध्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात शनिवारी दिवसभर नऊ हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कोणतीही अनूचित घटना घडली नाही. दरम्यान, आज (रविवारी) मुस्लिम धर्मीयांचा 'ईद ए मिलाद' असल्याने शहरात कडक बंदोबस्त असणार आहे. 

पुणे : अयोध्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात शनिवारी दिवसभर नऊ हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कोणतीही अनूचित घटना घडली नाही. दरम्यान, आज (रविवारी) मुस्लिम धर्मीयांचा 'ईद ए मिलाद' असल्याने शहरात कडक बंदोबस्त असणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयाकडून येणाऱ्या निकालाच्या अनुषंगाने शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, या दृष्टीने पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले. शहरातील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्याबरोबरच सुटीवर गेलेल्या कर्मचाऱ्यांनाही कामावर हजर राहण्यास सांगण्यात आले. त्यानुसार, काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच बंदोबस्तावर नेमण्यात आले. 

दरम्यान, शनिवारी सकाळी सहापासूनच शहरातील सर्व प्रमुख चौक, प्रमुख रस्ते, धार्मिक स्थळे, संस्था व संघटनांची कार्यालये या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याबरोबरच पोलिसांनी काही संवेदनशील ठिकाणांची निवड केली होती. त्यानुसार संबंधित ठिकाणी अतिरिक्त पोलिस व राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. 

डॉ. शिसवे म्हणाले, "निकालानंतर काही ठिकाणी धार्मिक कार्यक्रम करण्याचा प्रयत्न झाला. मात्र पोलिसांनी संबंधितांना सूचना दिल्यानंतर त्यांनी कार्यक्रम घेतले नाहीत. शहरात शनिवारी कडक पोलिस बंदोबस्त होता. त्यामुळे अनुचित घटना घडली नाही. दिवसभर शांतता होती, शहरातील सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू होते.'' 
 

"गुड मॉर्निंग स्क्वॉड'च्या पथकांत वाढ 
पहाटेच्यावेळी कार्यरत असणाऱ्या पोलिसांच्या "गुड मॉर्निंग स्क्वॉड'च्या पथकास शनिवारी आणखी दोन पथकांची जोड देऊन एकूण तीन "गुड मॉर्निंग स्क्वॉड' पथके शहरात कार्यरत होती. त्यांच्याकडून धार्मिक स्थळे, पुतळ्यांची पाहणी करण्यात येत होती. 
 

''अयोध्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर दहा दिवसांपासूनच पोलिसांनी काम सुरू केले होते. न्यायालयाच्या निकालाचा आदर ठेवावा, असे आवाहन केले होते; तसेच सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनाही सूचना दिल्या होत्या. पोलिसांच्या आवाहनास नागरिकांनी प्रतिसाद दिल्यामुळे शनिवारी शहरामध्ये शांतता कायम राहिली.'' 
- डॉ. के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: peaceful Atmosphere in Pune due to police settlement