पिसारा फुलवून नाचणाऱ्या लाडक्या मोराच्या मृत्यू पाणावले अनेकांचे डोळे  

peacock
peacock

वरवंड (पुणे) : पुणे- सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील वरवंड येथील पंधरामोरी पुलानजीकच्या शेतशिवारात आपल्या खास शैलीत मान डोलावत, पिसारा फुलवून नाचून, बागडून अनेकांना भुरळ पाडणाऱ्या एका मोराचा आज अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली. वनविभागाच्या वतीने अज्ञात वाहन चालकाविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला.

वरवंड परिसरात काही दिवसांपासून मोरांची संख्या वाढलेली दिसत आहेत. पुणे- सोलापूर महामार्गावरून जाताना पंधरामोरी पुलाजवळ शेतशिवरात काही वर्षांपासून मोर, लांडोर यांचा वावर आहे. यामध्ये पूर्ण वाढ झालेला एक मोर हमखास दिसत असे. आपला भला मोठा पिसारा व देखण्या रूपाने तो अनेकांची मने आकर्षित करून घ्यायचा. रस्त्याने जाताना मोर पाहून अनेक जण त्याची छबी टिपल्याशिवाय पुढे जात नव्हते. सायंकाळी अनेक महिला व पुरुष महामार्गाच्या सेवा रस्त्याने गावातून पंधरामोरी पुलापर्यंत चालत जातात. या वेळी अनेकांची नजर हमखास या मोराला शोधायची आणि काही क्षणात मान डोलवत हा मोर एखाद्या झाडाखाली किंवा अगदी सेवा रस्त्याच्या बाजूला दिसून यायचा.

नेहमी नजरेस पडणार हा मोर तसा सर्वांच्या चांगलाच परिचयाचा झाला होता. त्याच्या सोबत त्याचे सहकारी, लांडोर पण दिसायचे. पण, मध्येच माशी शिंकली अन् या मोरावर काळाचा घाला पडला. सायंकाळी मोर महामार्ग ओलांडून पलिकडे जात असताना वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाची त्यास धडक बसली आणि क्षणात मोराचे अस्तिस्तव संपले. अपघातात गंभीर जखमी झाल्याने मोराचा जागीच मृत्यू झाला. 

याबाबतची माहिती मिळताच वनपरिमंडल अधिकारी चैतन्य कांबळे, वनकर्मचारी अरुण मदने यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत मोराला महामार्गावरून बाजूला घेतले. नेहमी आनंदाने नाचून सर्वांना भुरळ पडणारा मोर निपचिप पडल्याचे पाहून अनेकांचे डोळे पाणवले होते. अनेकांनी हळहळ व्यक्त केली. वनविभागाने पंचनामा करून मृत मोराचे विच्छेदन करण्यासाठी नेले. त्यानंतर त्यास दहन करण्यात आले. अपघात प्रकरणी वनविभागाने अज्ञात वाहन चालकाविरुद्ध वनगुन्हा दाखल केला.

दरम्यान, महामार्गालगत अनेक वन्यजिवांचा वावर वाढत आहे. या भागातून जाताना वाहनांची वेग मर्यादा कमी असणे गरजेचे आहे. एखाद्या वन्यप्राणी, पक्ष्याचा अपघात झाल्यास वनविभागाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन वनाधिकारी कांबळे यांनी केले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com