भांबुर्डा वनक्षेत्रातील मोरांचे अस्तित्व धोक्यात

भांबुर्डा वनविहारातील मनमोहक मोर.
भांबुर्डा वनविहारातील मनमोहक मोर.

पौड रस्ता - भांबुर्डा वनविहार क्षेत्रात सातशेहून अधिक मोरांचे वास्तव्य आहे. मात्र, भटक्‍या कुत्र्यांमुळे त्यांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त करून येथे मयूर अभयारण्य करण्याची मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे.

कोथरूड, बावधन परिसर मोठ्या प्रमाणात विकसित होत असताना २५० एकर क्षेत्रात व्यापलेले भांबुर्डा वनविहार क्षेत्र मात्र विकासापासून वंचित आहे. या वनक्षेत्राच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला.

विकासाचा प्लॅन नागरिकांच्या सहभागातून करण्यात येणार, अशा बातम्या गेली चार वर्षे येथील नागरिक ऐकत आहेत. पण, पैसा आला कोठे आणि गेला कोठे, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. सातशेहून अधिक मोरांचे येथे वास्तव आहे. भटक्‍या कुत्र्यांकडून मोरांची शिकार केली जात आहे. अनेकवेळा निसर्गप्रेमींनी वन विभागाकडे कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. 

मात्र, त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. भांबुर्डा वनक्षेत्रअंर्तगत असलेल्या कोथरूडमधील म्हातोबा टेकडी परिसरात बांबूची काही रोपे वन विभागाने आणून ठेवली आहेत. 

मात्र, त्यांची अद्याप लागवड झालेली नाही. या परिसरात झाडे व पक्ष्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या टाक्‍यांची सोय करण्यात आली आहे. पण, त्यामध्ये पाणी टाकले जात नाही. त्यामुळे या भागात फिरायला येणारे नागरिक पाणी व धान्याची सुविधा उपलब्ध करून देत आहेत.

वन विभागाने मोरांची गणना केलेली नाही. परंतु, सुमारे सातशे मोर भांबुर्डा वनक्षेत्रात असावेत. येथे असलेली ग्लिरिसिडीयाची (गिरिपुष्प) झाडे काढून तेथे देशी झाडे लवण्याचा प्रयत्न वन विभाग करत आहे. नक्षत्रवन, दुर्मीळ वनस्पती उद्यान, विविध बांबंची लागवड अशा संकल्पना या भागात राबविण्याचा प्रयत्न आहे.
- दीपक पवार, भांबुर्डा वन अधिकारी

या काळात मोरपिसांची वाढ झालेली असते. पिसाऱ्यामुळे मोरांना उडणे, पळणे अवघड जाते. त्याचा फायदा घेत मोकाट कुत्रे मोरांची शिकार करतात. त्यामुळे या परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर पूर्णपणे बंद होईल, याची व्यवस्था वन विभागाने करणे आवश्‍यक आहे.
 - सनी खोमणे, निसर्गप्रेमी

या भागात असलेली मोरांची संख्या पाहता येथे एक सुंदरसे मयूर अभयारण्य उभारता येणे सहजशक्‍य आहे. कृत्रिम काही करण्यापेक्षा येथील जैवविविधतेला साजेशी नैसर्गिक रचना वापरून वन विभागाने निसर्गसंपदेचे संवर्धन करावे.
- सचिन धनकुडे, चेंज इंडिया फाउंडेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com