शेटेवस्तीत घेतली मोराने ‘शाळा’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

टाकवे बुद्रुक - ठिकाण : आंदर मावळातील शेटेवस्तीतील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा. वेळ : सकाळी साडेदहाची. शाळेत पायाभूत चाचणी परीक्षेची तयारी सुरू. त्यामुळे विद्यार्थी वर्ग अभ्यासाच्या तणावाखाली. काही वर्गांमधून ‘बे एके बे’चा स्वर घुमत असतानाच अवचितपणे त्याचे आगमन होते. बघता बघता त्याला पाहण्यासाठी संपूर्ण शाळा जमा होते. सर्वच वातावरण भारावलेले. अल्पावधीतच परीक्षेचे तणावपूर्ण वातावरण निवळते. 

‘मोर’ हा सर्वांचाच आवडता पक्षी. किंबहुना, लहान बाळाला सर्वांत पहिले ‘इथे इथे बस रे मोरा’ या बडबडगीतांतून मोराची ओळख होते. पुढे, शालेय जीवनात ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’ या गीतातून ओळख पक्की होते. त्यामुळे अनपेक्षितरीत्या मोराने लावलेल्या हजेरीने सारेच जण मोहरून जातात. मंगळवारी (ता. २८) जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रत्येकाने हा अनुभव घेतला. सुरवातीला प्रांगणात नंतर व्हरांड्यात आणि त्यानंतर थेट त्याने वर्गातच प्रवेश केला. तेथील टेबलावर उभे राहून सर्व वर्ग न्याहाळला. बाकावर बसलेली मुले मोराच्या या हालचाली बारकाईने टिपत होते. गुरुजींनी विद्यार्थ्यांना शांत बसण्याचे आवाहन केले. त्यामुळे थोडी धिटाई करत तो वर्गात वावरून दुसऱ्या वर्गात गेला. असाच बराच वेळ तो शाळेमध्ये रमला. दोन तास तो येथेच होता. नंतर तो आंब्याच्या बागेच्या दिशेने गेला;  पण विद्यार्थ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. 

आंदर मावळच्या डोंगर पठारावर दहा वर्षांपासून पवनचक्‍क्‍या वीजनिर्मिती करीत आहेत. त्यांच्या पंख्यांची होणारी घरघर ऐकून वन्यप्राणी डोंगरावरून खाली येत आहेत. मोराचे हे आगमन त्यातूनच असावे, असा अंदाज आहे. मात्र, तो जणू शाळेच्या इन्स्पेक्‍शनसाठी आला आहे, अशा थाटात वावरला. अशाप्रकारे मोराच्या येण्याचे प्रकाश सातपुते व संतोष शेटे हे शिक्षकही अचंबित झाले. एरवी पुस्तकातूनच भेटणाऱ्या या मोराला जवळून न्याहाळण्याची संधी विद्यार्थ्यांनाही मिळाली.

Web Title: peacocks found in zp school

टॅग्स