पादचारी, चालकांची सुरक्षा वाऱ्यावर

पादचारी, चालकांची सुरक्षा वाऱ्यावर

पुणे - पावसाळ्यापूर्वी वर्दळीच्या रस्त्यांची डागडुजी, गटारांवरील झाकणांची (चेंबर) कामे करणे, झाडांच्या धोकादायक फांद्या छाटणे, रस्ते, पदपथावरील विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीची घोषणा महापालिका प्रशासनाने केली खरी; मात्र पावसाला सुरवात झाल्यानंतरही खड्डे तसेच असून तेथे पाणी साचत आहे. 

माती, वाळूही पडलेली दिसते. काही भागांतील चेंबर रस्त्यापासून खाली-वर आहेत. झाडांच्या फांद्याही धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे प्रमुख रस्ते पादचारी, चालकांसाठी असुरक्षित असल्याचे  स्पष्ट होत आहे.पावसाळ्यात खबरदारीचा उपाय म्हणून पादचारी आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना केल्या जातात. प्रमुख्याने खड्डे बुजविण्यासह उघड्यावरील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याला प्राधान्य दिले जाते. ही कामे साधारणपणे १५ मेपर्यंत करणे अपेक्षित असते. मात्र, काही भागांत ओढे-नाले, पावसाळी गटारांची दुरुस्ती करण्यात येत असल्याचे दाखविणाऱ्या महापालिकेचे रस्ते, झाडे, वाहिन्यांच्या कामांकडे दुर्लक्ष केले आहे. पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर तीन आठवड्यांपूर्वी महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ७० टक्के कामे आटोपल्याचे खातेप्रमुखांनी जाहीर केले होते. त्यांच्या दाव्यानुसार ही कामे कुठे झालीत किंवा सुरू आहेत का, असे प्रश्‍न आहेत. 

वाहने घसरण्याचा धोका
शहरातील डांबरी आणि सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांवर काही भागांत खड्डे आहेत. गेल्या दोन दिवसांत काही रस्त्यांवर वाळू पडल्याचे दिसते. त्यामुळे वाहने घसरण्याचा धोका आहे. ऐन पावसाळ्यात रस्त्यांची कामे करता येत नाहीत. ती पावसाळ्यापूर्वीच करायला हवीत. ती होत असल्याचे सांगण्यात येत असले, तरी शास्त्री रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्त्यावर पहिल्या दोन पावसातच पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीचा वेग कमी होऊन ती विस्कळित झाली. 

चेंबर, खड्डे जीवघेणे
गेल्या काही महिन्यांत शहरात सुमारे सव्वाचारशे ते साडेचारशे किलोमीटरच्या रस्त्यांची कामे करण्यात आली. तेव्हा सांडपाणी (ड्रेनेजलाइन) आणि पावसाळी गटारांवरील झाकणे म्हणजे, चेंबरची उंची कमी-अधिक झाली आहे. बहुतांशी ठिकाणी हे चेंबर रस्त्यापासून फारच खाली गेल्याने ते चालकांसाठी जीवघेणे ठरण्याची भीती आहे. हे चित्र वर्दळीच्या रस्त्यांवरचे आहे. पावसाचे पाणी साचल्याने चेंबर आणि तेथील खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे ते विशेषत: दुचाकीस्वारांसाठी धोकादायक आहेत. 

रस्त्यांच्या डागडुजीची कामे सुरू आहेत. खड्डे बुजविण्यात आले असून, चेंबरची दुरुस्तीही करण्यात येत आहे. शिवाय, भूमिगत वाहिन्यांमधील गाळ काढला आहे. मात्र, ज्या भागात खड्डे आणि नादुरुस्त चेंबर आहेत, ती कामे करण्यात येतील.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग, महापालिका

रस्त्यालगत आणि उद्यानांतील झाडांच्या फांद्या छाटल्या आहेत. पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा पाहणी करून खबरदारी घेतली जाईल.
- अशोक घोरपडे,  प्रमुख, उद्यान विभाग, महापालिका

फांद्या छाटण्याची गरज
रस्त्यालगतच्या झाडांच्या फांद्याही वाढल्या आहेत. पावसाचा जोर वाढल्यास त्या पडू शकतात. कोरेगाव पार्कमधील एका रस्त्यावर मोठ्या झाडाची फांदी पडली. हानी टळली. मात्र, त्या भागात अनेक झाडांच्या फांद्या वाढल्या आहेत. अशा धोकादायक फांद्या काढण्याची सूचना उद्यान विभागाला केल्याचे महापालिका प्रशासन सांगत आहे. दुसरीकडे ही कामे सुरू असल्याचा दावा या विभागाच्या प्रमुखांचा आहे. लोकांच्या तक्रारीनंतर फांद्या काढण्यात येत असल्याचे या खात्याकडून सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com