‘दगडूशेठ’ परिसरात पेढ्यांत भेसळ

Pedha
Pedha

पुणे - श्रीमंत दगडूशेठ गणपतीला अर्पण करण्यासाठी त्या परिसरातील पेढे तुम्ही घेता. प्रसादाच्या रूपातील ते पेढे गणपतीपुढे मोठ्या भक्तिभावाने ठेवता आणि स्वतःही नमस्कार करत पेढ्याचा तुकडा तोंडात टाकता... पण सावधान! दगडूशेठ गणपती मंदिराच्या परिसरात प्रसाद म्हणून विक्री होणाऱ्या पेढ्यांमध्ये भेसळ असल्याचा अहवाल राज्य आरोग्य प्रयोगशाळेने दिला आहे. त्या आधारावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) येथील पेढे आणि मोदक विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देशात प्रसिद्ध आहे. याच्या दर्शनासाठी देश-विदेशांतून भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. त्या वेळी हे भाविक आजूबाजूच्या दुकानांमधून प्रसाद म्हणून पेढे विकत घेतात. हे पेढे प्रसाद म्हणून वाटतात. या पेढ्यांच्या गुणवत्तेबद्दलच्या तक्रारी ‘एफडीए’कडे आल्या होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर या परिसरातील पेढ्यांच्या दुकानांची तपासणी करून त्यातील पेढे आणि मोदकांचे नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले. अत्यंत अस्वच्छ वातावरणात हे पेढे तयार केले जात असल्याचेही अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी नमुने तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविले. त्यातून या पेढ्यांमध्ये भेसळ असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती ‘एफडीए’चे सहायक आयुक्त संजय शिंदे यांनी दिली. गुजरातच्या खव्यापासून पेढे बनवून ग्राहकांची फसवणूक करू नये, असे आवाहन एफडीएने केले आहे. 

अशी केली कारवाई
जय गणेश स्वीट सेंटरमध्ये स्पेशल बर्फीपासून गलिच्छ वातावरणात पेढे तयार करत असल्याचे अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांना दिसले. त्याच वेळी जय मातादी फोटो फ्रेममध्ये, नारळ व पेढ्यांची किरकोळ विक्री करणाऱ्याने श्रीमंत पेढेवाले यांच्याकडून पेढे खरेदी केल्याचे सांगितले. कमी दर्जाच्या स्पेशल बर्फीमध्ये रंग टाकून अस्वच्छ वातावरणात पेढे तयार केले जात होते. त्यासाठी अन्न परवानादेखील नव्हता, असे तपासणीच्या वेळी दिसून आले.

पेढ्यातील अर्थकारण
गुजरात स्पेशल बर्फीपासून हे पेढे तयार केले जातात. गुजरातहून येणाऱ्या बसमध्ये टाकून ही बर्फी पुण्यात येते. ही बर्फी १२० रुपये किलो या दराने खरेदी केली जाते. त्यापासून पेढे तयार करताना त्याला फक्त तूप लावले जाते. त्यानंतर या एक किलो पेढ्याची किंमत ४०० रुपये होते.

दगडूशेठ गणपती मंदिर परिसरातील कमी गुणवत्तेच्या पेढ्यांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई सुरू आहे. या परिसरातील आठ नमुने तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेला दिले होते. त्यापैकी दोन स्पेशल बर्फीचे होते. त्यात अपमिश्रित पदार्थ आढळून आला. तर, तीन पेढ्यांचे नमुने खराब आले आहेत. त्या आधारावर या विक्रेत्यांवर कायदेशीर प्रक्रियेनुसार कारवाई करण्यात येत आहे.
- संजय शिंदे, सहायक आयुक्त, एफडीए, महाराष्ट्र राज्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com