सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून दंड वसूल करा; जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशासनाला सूचना

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

तंबाखूचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेवून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायद्याबाबत व्यापक स्वरूपात जनजागृती करावी.

पुणे : सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या आणि धूम्रपान करणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करावा. कोरोना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिस आणि संबंधित विभागांनी कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गुरुवारी (ता.१०) आयोजित जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत डॉ. देशमुख बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, जिल्हा समन्वयक डॉ. सुहासिनी घाणेकर, जिल्हा सल्लागार डॉ. राहूल मणियार यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. 

हॉटेलांची १० कोटींची बिलं थकली; डॉक्‍टरांच्या राहण्याची केली होती सोय​

डॉ. देशमुख म्हणाले, तंबाखूचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेवून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायद्याबाबत व्यापक स्वरूपात जनजागृती करावी. कायद्याबाबत नियमित प्रशिक्षणावर भर द्यावा. नागरिकांनीही अशा पदार्थांचे सेवन टाळणे गरजेचे आहे. नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा.

सरकारी कार्यालये, पोलिस ठाण्यासह इतर कार्यालये तंबाखूमुक्त करण्यासाठी संबंधित कार्यालय प्रमुखांनी प्रयत्न करावेत. शिक्षक हे विद्यार्थ्यांसमोर आदर्शस्थानी असल्यामुळे शिक्षकांनी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करता कामा नये. "तंबाखू मुक्त शाळा अभियान' यशस्वीपणे राबविण्यासाठी शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषदेने नियोजन करावे, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Penalties should be levied on citizens who spit and smoke in public places ordered Pune collector Rajesh Deshmukh