प्रवाशाने छायाचित्रे काढल्यास विमान कंपनीला दंड 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

लोहगाव विमानतळावरून विमानात बसताना धावपट्टीजवळ विमानाची छायाचित्रे प्रवाशांनी काढल्यास संबंधित विमान कंपनीला किमान तीन हजार रुपयांचा दंड करण्यात येणार असल्याचे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

पुणे - लोहगाव विमानतळावरून विमानात बसताना धावपट्टीजवळ विमानाची छायाचित्रे प्रवाशांनी काढल्यास संबंधित विमान कंपनीला किमान तीन हजार रुपयांचा दंड करण्यात येणार असल्याचे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

लोहगाव विमानतळावर हवाई दलाचाही सराव होत असतो. हवाई दलाचीही विमाने उभी असतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा विमानतळ संवेदनशील आहे. त्यामुळे "सिक्‍युरिटी चेक इन' झाल्यावर विमानात बसताना प्रवाशांनी विमानांची छायाचित्रे घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचेही विमानतळ प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, काही हौशी प्रवासी मोबाईल अथवा कॅमेऱ्यांतून छायाचित्रे घेत असल्याचे दिसून आले आहे. त्याबाबत प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक फेरीच्या वेळी विमान कंपन्यांनी प्रवासी छायाचित्रे काढणार नाहीत, यासाठी आठ ते दहा कर्मचारी नियुक्त करावेत, असे सांगण्यात आल्याची माहिती विमानतळाचे संचालक अजयकुमार यांनी दिली. 

प्रवाशाने छायाचित्रे काढल्यास तातडीने ती डीलिट करण्यात यावी. प्रवाशाने ऐकले नाही, तर संबंधित प्रवाशाविरुद्ध विमान कंपनीला पोलिसांकडे तक्रार देता येईल. तसेच, संबंधित विमान कंपनीला किमान तीन हजार रुपयांचा दंड होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: Penalty for the airline if photographs are taken by the passengers