चार वर्षांपासून पेन्शनसाठी लढा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मार्च 2019

पुणे - सरकारी काम आणि मरेपर्यंत थांब, असा अनुभव घेत पुण्यातील रमेश काशीद गेली चार वर्षे निवृत्तिवेतन मिळविण्यासाठी सरकारी उंबरे झिजवत आहेत; परंतु सरकारी यंत्रणा त्यांना दाद देत नाही. त्यांनी उद्विग्न होऊन मंत्रालयात जीवन संपविण्याचा इशारा दिला आहे. माझ्यानंतर तरी कुटुंबाला न्याय द्या, असे त्यांनी सरकारला सुनावले आहे.

काशीद हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यालयीन सहायक पदावर कार्यरत होते. विद्यापीठात २७ वर्षे सेवा करून ते जून २०१५ मध्ये निवृत्त झाले. त्यांनी निवृत्तिवेतनासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, नियुक्तीच्या वेळी वयाधिक्‍य असल्याचे तांत्रिक कारण देत त्यांचे प्रकरण रोखून धरण्यात आले; पण वयाधिक्‍य असलेल्या सहा जणांना ते उच्च न्यायालयात गेल्याने निवृत्तिवेतन सुरू केले. 

काशीद यांना सेवेत असताना सरकारने पाचवा आणि सहावा वेतन आयोग यांसह सर्व आर्थिक लाभ दिले आहेत. ‘सकाळ’ने गेल्या वर्षी नागपूर येथे आयोजित केलेल्या ‘सकाळ पेंडॉल’ कार्यक्रमात त्यांनी तक्रार केली होती. त्याची दखल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतली. 

हे प्रकरण विधी व न्याय विभागाकडे पाठविले. त्यांनी योग्य कार्यवाहीसाठी प्रकरण पुन्हा उच्च शिक्षण विभागाकडे पाठविले. नंतर त्यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविले. हा विभाग मात्र ढिम्म आहे. 

सरकारी अधिकारी सभ्यपणे बोलतदेखील नसल्याचे काशीद यांचा अनुभव आहे. ‘‘माझ्यासारखे वीसहून अधिक कर्मचारीदेखील हेच अनुभवत आहे. गेली चार वर्षे निवृत्तिवेतन नसल्याने घर चालविणे, मुलीचे लग्न करणे अवघड झाल्याने नैराश्‍य आले आहे. सरकारला मी गेल्यानंतरच मला न्याय द्यायचा आहे का,’’ असा त्यांचा सवाल आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pension Issue Ramesh Kashid