नागरिकांना लष्करी प्रशिक्षण द्यावे - डॉ. गोखले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

पुणे - डॉ. रवी गोखले मूळचे पुण्याचे. व्यवसायाने त्वचारोग तज्ज्ञ. डॉक्‍टर झाल्यावर ते इंग्लंडला गेले आणि तेथेच स्थायिक झाले. एवढेच नव्हे, तर ब्रिटिश आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नलही झाले. प्रिन्स हॅरीसोबत अफगाणिस्तानला जाऊन युद्धाच्या प्रसंगात, तसेच युरोपमधील आपत्कालीन परिस्थितीतही त्यांनी वैद्यकीय सेवा बजावली. जगातील प्रत्येक देशाने किमान एक वर्ष नागरिकांना लष्करी प्रशिक्षण दिल्यास त्यांच्यामध्ये शिस्त, संघटनकौशल्य आणि आत्मविश्‍वास वाढेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

डॉ. गोखले यांनी शनिवारी ‘सकाळ’ला भेट दिली, या वेळी ते बोलत होते. ब्रिटिश आर्मीबद्दलची त्यांची मते व अनुभव त्यांनी सांगितला. इंग्लंडला गेल्यावर त्यांनी ब्रिटिश आर्मीत दाखल होण्याचा निर्णय घेतला. आवश्‍यक ते प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्यांना ब्रिटिश आर्मीने अमेरिका, नार्वे, जर्मनी, युरोप, इराक व अफगाणिस्तानला वेगवेगळ्या मोहिमांवर पाठविले होते. 

जवानांवर वैद्यकीय उपचार करताना आणीबाणीच्या प्रसंगांत त्यांना शस्त्रही चालवावे लागले. २००५मध्ये प्रिन्स हॅरीसोबत ते वैद्यकीय उपचारासाठी ब्रिटिश आर्मीच्या तुकडीत सहभागी झाले होते. युद्धभूमीवर वैद्यकीय सेवा देताना अनेक अडचणींचा त्यांना सामनाही करावा लागला. तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात ४८ तास रुग्णालयात राहून रात्रंदिवस वैद्यकीय उपचार करताना स्वसंरक्षणासाठी शस्त्राचाही वापर करावा लागला. मात्र, त्यांनी दाखविलेल्या कर्तबगारीमुळे त्यांना युरोप, अमेरिकेतील वेगवेगळ्या मोहिमांवरही पाठविण्यात आले व त्या मोहिमांचे नेतृत्व करण्याची संधीही त्यांना मिळाली. 

पुण्यात परतायची इच्छा  
इंग्लंड, अमेरिकेत स्वातंत्र्य व लोकशाही सुरक्षितता आहे. मात्र तेथे व्यावहारिकता अधिक आहे. या दोन्ही देशांमध्ये अनेक भारतीय नागरिक आहेत, ते एकमेकांच्या संपर्कात राहतात; पण परदेशी नागरिकांत फारसे मिसळत नाहीत, त्यामुळे भारतात परत यावेसे वाटते; कारण भारतीय मनाने मोकळे आहेत, असे सांगून डॉ. रवी गोखले यांनी पुण्यात परतण्याची भावना व्यक्त केली. 

मी ब्रिटिश आर्मीमध्ये सहभागी झालो, त्यामुळे मला जगभरातील अनेक देशांमध्ये फिरता आले, तेथील परिस्थिती जाणून घेता आली. भारतातही अशापद्धतीचे प्रशिक्षण नागरिकांसाठी असायला हवे. इस्राईल, इजिप्तमध्येही नागरिकांसाठी लष्करीसेवेचे प्रशिक्षण देण्यात येते. मी जेव्हा डॉक्‍टर झालो, तेव्हा माझ्याकडे केवळ पुस्तकी ज्ञान होते. वैद्यकीय क्षेत्राचे व्यावहारिक ज्ञान नव्हते. ते मी ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये जाऊन घेतले.
- डॉ. रवी गोखले 

Web Title: People Army Training Dr. Ravi Gokhale