रुग्णांच्या जिवाशी का खेळता?

Doctor
Doctor

नारायणगाव (पुणे) : नारायणगाव (ता. जुन्नर) परिसरात डेंगीमुळे दोघांचा नुकताच मृत्यू झाल्याने येथील वैद्यकीय सेवा चव्हाट्यावर आली आहे. सरकारी रुग्णालयात सुविधा व डॉक्‍टरांचा अभाव असल्यामुळे रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेतात. कट प्रॅक्‍टिसचा संसर्ग बहुतेक खासगी डॉक्‍टरांना झाल्यामुळे पैसे देऊनसुद्धा योग्य उपचार मिळत नाहीत. होमिओपॅथिक (युनानी) व आयुर्वेदिक पदवी धारण केलेले डॉक्‍टर ऍलीपॅथीच्या जुजबी ज्ञानावर उपचार करून रुग्णांच्या जिवाशी खेळत आहेत, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.

डेंगीचे वेळीच निदान न झाल्यामुळे नूरजहॉं जमील शेख (वय 35, रा. नारायणगाव) व विक्रांत पोपट भुजबळ (वय 25, रा. वारूळवाडी) या दोघांचा नुकताच मृत्यू झाला आहे. नूरजहॉं शेख यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. मात्र, डॉक्‍टर नसल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक अवस्थेत डेंगीचे निदान न झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. विक्रांत भुजबळ यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. डेंगीचे वेळीच निदान न झाल्यामुळे आजार बळावला. डेंगीनंतर विक्रांतला न्यूमोनिया झाला. त्यानंतर येथील डॉक्‍टरने पुणे येथे नेण्यास सांगितले. उपचार सुरू असताना 28 नोव्हेंबर रोजी विक्रांत याचे निधन झाले. दोन महिन्यांपूर्वी येथील जितेश पांचाळ (वय 30) याचा डेंगीमुळे मृत्यू झाला होता.

मागील वर्षी येथील होमिओपॅथिक डॉक्‍टरच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे एका महिलेचा डेंगीमुळे मृत्यू झाला होता. सरकारी दवाखान्यात सुविधांचा अभाव असल्यामुळे गरीब रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल होतात. उपचारासाठी आलेल्या रुग्णाच्या खिशाकडे लक्ष ठेवून कट प्रॅक्‍टिसचा संसर्ग झालेले बहुतेक डॉक्‍टर रुग्णांवर उपचार करत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.

अशी चालते कट प्रॅक्‍टिस
पैसे कमावण्याचा उद्देश ठेवून बहुतेक डॉक्‍टरांनी स्वतःच्या दवाखान्यात मेडिकल दुकाने थाटली आहेत. यामुळे अनावश्‍यक औषधांचा भार रुग्णावर लादला जातो. पॅथॉलॉजी लॅबधारकांचे डॉक्‍टरांशी संधान असते. बहुतेक डॉक्‍टरांच्या पॅथॉलॉजी लॅब ठरलेल्या आहेत. डॉक्‍टरांना कमिशन द्यावे लागत असल्याचे पॅथॉलॉजी लॅबचालक खासगीत सांगत आहेत. येथील काही डॉक्‍टरांनी एकत्र येऊन स्वतःची डायग्नॉस्टिक यंत्रणा उभारली आहे. साधे डोके दुखत असेल तरी सीटी स्कॅन करायला भाग पाडले जाते. अनावश्‍यक तपासण्या करून रुग्णांना आर्थिक अडचणीत आणले जाते.

डॉक्‍टरांवर कारवाईची मागणी
येथील हनुमान चौकात होमिओपॅथिक डॉक्‍टरने रुग्णालय थाटले आहे. ऍलीपॅथीचे ज्ञान नसताना, अत्यावश्‍यक वैद्यकीय सुविधा नसताना हा डॉक्‍टर अपुऱ्या जागेत रुग्णांना दाखल करून उपचार करत आहे. काही तज्ज्ञ डॉक्‍टरांनी या डॉक्‍टरसंदर्भात तक्रारी केल्या आहेत. ऍलीपॅथीचे उपचार करणाऱ्या या डॉक्‍टरवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे नारायणगाव शहर अध्यक्ष किरण फाकटकर यांनी केली आहे.

बिल स्वीकारले जाते रोखीने
डॉक्‍टर वैद्यकीय बिल रोखीनेच स्वीकारतात. धनादेश किंवा आरटीजीएसने पैसे स्वीकारले जात नाहीत. रुग्णालयात स्वायप यंत्रणा नसल्यामुळे कार्डद्वारे पैसे डॉक्‍टर स्वीकारत नाहीत. यामुळे डॉक्‍टरांना मिळणाऱ्या उत्पन्नाचा अंदाज येत नाही. याचा फायदा डॉक्‍टरांना आयकर भरताना होतो.

अशी वेळ दुसऱ्यावर येऊ नये
नूरजहॉं यांचे पती जमील शेख म्हणाले, ""डेंगीचे वेळीच निदान न झाल्याने माझ्या पत्नीचा मृत्यू झाल्याने माझा संसार उद्‌ध्वस्त झाला आहे. अशी वेळ इतरांवर येऊ नये. सरकारने ग्रामीण रुग्णालयाकडून दिल्या जाणाऱ्या सेवेकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे.

वैद्यकीय शास्त्रानुसार होमिओपॅथिक डॉक्‍टरला ऍलीपॅथीचे उपचार करण्यास निर्बंध आहेत. या डॉक्‍टरला मागील वर्षी सूचना केली होती. ऍलीपॅथीचे उपचार करणाऱ्या होमिओपॅथिक (युनानी) व आयुर्वेदिक डॉक्‍टरांना नोटिसा बजावून तत्काळ कारवाई केली जाईल.
- डॉ. उमेश घोडे, आरोग्य अधिकारी, जुन्नर तालुका

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com