Loksabha 2019 : पुणेकरच निवडणार बारामती, शिरूरचे खासदार 

मंगेश कोळपकर 
सोमवार, 15 एप्रिल 2019

पुणे महापालिकेच्या हद्दीत असलेल्या खडकवासला आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातील मतदानावरच यंदा बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार निश्‍चित होतील, अशी चिन्हे आहेत.

पुणे : पुणे महापालिकेच्या हद्दीत असलेल्या खडकवासला आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातील मतदानावरच यंदा बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार निश्‍चित होतील, अशी चिन्हे आहेत. त्यामुळेच भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने या दोन्ही मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले असून, त्यावर वर्चस्वासाठी धुमश्‍चक्री सुरू आहे.

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी खडकवासला हा बारामतीला, तर हडपसर हा शिरूर लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आला आहे. बारामती आणि शिरूरमध्ये या विधानसभा मतदारसंघातील मतदारसंख्या निर्णायक ठरणार आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपचे आमदार असून, गेल्या लोकसभा निवडणुकीतही याच पक्षाला मताधिक्‍य मिळाले होते. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांतील मताधिक्‍य टिकविण्यासाठी भाजपचे उमेदवार अनुक्रमे कांचन कुल आणि शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे काम करीत आहेत. खडकवासल्यामधून मताधिक्‍य मिळविण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी जाणीवपूर्वक दोन वर्षांपासूनच विविध प्रकारे प्रयत्न केले. शिरूरमधील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनीही हडपसरवर जादा भर दिला आहे. या दोन्ही मतदारसंघांत प्रामुख्याने शहरी मतदार आहेत. त्यांची संख्या जास्त असल्यामुळे येथील मतदानच निर्णायक ठरणार आहे. 

खडकवासल्यात हातघाई 
खडकवासल्यातील धनकवडी, वारजे भागात राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे; तर सिंहगड रोड, भुसारी कॉलनी, बावधनमध्ये सध्या भाजपचे बळ आहे. पूर्वी राष्ट्रवादीला अनुकूल असलेल्या या मतदारसंघातील अनेक भागांत भाजपच्या नगरसेवकांचीही संख्या सध्या जास्त आहे. त्यामुळे अनुकूल असलेल्या भागात मतदानावर दोन्ही पक्षांचे लक्ष आहे. बूथनुसार मतदारांवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे भाजप आणि राष्ट्रवादीचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अनुक्रमे अरुण राजवाडे आणि काका चव्हाण यांनी सांगितले. 

हडपसरमध्ये वर्चस्वाचे युद्ध 
हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. परंतु, गेल्या लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला मताधिक्‍य मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे नगरसेवक जास्त आहेत. तसेच, पक्षाची संघटना बांधणी चांगली असल्यामुळे येथून राष्ट्रवादीलाच मताधिक्‍य मिळेल, असा दावा पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केला आहे. या मतदारसंघात नवमतदारांची वाढलेली संख्या मोठी आहे. पूर्वीच्या तुलनेत नगरसेवक, कार्यकर्त्यांची संख्या वाढली आहे. शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकदिलाने काम करीत असल्याने आढळराव पाटील यांनाच मताधिक्‍य मिळेल, असा विश्‍वास आमदार योगेश टिळेकर यांनी व्यक्त केला आहे. 

नवमतदार पोचले 97 हजारांवर 
बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा नवमतदारांची संख्या 35 हजारांनी वाढली आहे. तर, शिरूर लोकसभा मतदारसंघात त्यांची संख्या 62 हजार झाली आहे. नवमतदार प्रामुख्याने युवक आहेत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी दोन्ही पक्षांनी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू केला आहे. त्यासाठी युवक-युवतींची फौजही तैनात करण्यात आली आहे. 
 

Web Title: People of Pune will choos Baramati and Shirur MP