पेशवे उद्यानातील नौकाविहार इतिहासजमा

मयुरी शिंदे
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

नौकाविहाराचा छोटासा अनुभव देणाऱ्या पेशवे उद्यानात यापुढे नौका विहाराचा आनंद घेता येणार नाही. कारण, याठिकाणी आता संगीत कारंज्यांचे काम सुरू आहे; मात्र सध्या तेही रखडले आहे, त्यामुळे हे काम कधी पूर्ण होणार, याकडे पर्यटकांचे लक्ष लागले आहे. 

पुणे - नौकाविहाराचा छोटासा अनुभव देणाऱ्या पेशवे उद्यानात यापुढे नौका विहाराचा आनंद घेता येणार नाही. कारण, याठिकाणी आता संगीत कारंज्यांचे काम सुरू आहे; मात्र सध्या तेही रखडले आहे, त्यामुळे हे काम कधी पूर्ण होणार, याकडे पर्यटकांचे लक्ष लागले आहे. 

शहराच्या मध्य भागात असणाऱ्या पेशवे उद्यानातील प्राणी राजीव गांधी प्राणी संग्रहालयात हलविल्यानंतर येथे ऊर्जा उद्यान साकारण्यात आले. शेजारीच असणाऱ्या छोट्या तळ्यात नौकाविहाराची सोय होती. त्यामुळे फुलराणी, नौकाविहार आणि सौरऊर्जेवर चालणारी विविध उपकरणेही या उद्यानाचे आकर्षण होते. मात्र, ज्या तळ्यात नौकाविहार केला जात होता, त्याच्या नूतनीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. मात्र, त्याच्यामध्ये कोणतीही प्रगती नाही. त्यामुळे या उद्यानात येऊन करायचे काय, असा प्रश्‍न बालगोपाळांना पडत आहे. 

या संदर्भात महापालिकेकडे चौकशी केली असता, या तळ्यामध्ये आता संगीत कारंजे करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. कात्रज येथील तलावात अशी कारंजी बसविली आहेत, मात्र तीही नीट  चालत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे या उद्यानातील कारंजे सुरू होणार की नाही, याबाबतही साशंकता आहे.

कारंजे पाहण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या प्रेक्षक गॅलरीचे कामही अर्धवट आहे. तळ्याभोवती असणाऱ्या सुरक्षा कठड्यांचीही दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी कठडे कोसळले आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्‍यता आहे. उद्यानातील जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था झाली आहे. त्याच्या दुरुस्तीचे कामही संथगतीने सुरू आहे. त्यामुळे उद्यानात ठिकठिकाणी अस्वच्छता आणि प्लॅस्टिक कचऱ्याचे ढीग साचले आहेत, त्यामुळे उद्यानात येणाऱ्या पर्यटकांची निराशा होत आहे.

नौकाविहार आठ ते नऊ वर्षांपासून बंद आहे. तसेच, संगीत कारंज्यांचे काम विद्युत विभाग पाहतो. मात्र, संगीत कारंज्यामुळे नौकाविहार सुरू होणे अवघड आहे.
- अशोक घोरपडे, उद्यान अधीक्षक

पेशवे उद्यानामध्ये सुमारे ८० लाख रुपयांचा खर्च करून सात महिन्यांपूर्वी संगीत कारंजे उभे केले आहेत. आसनव्यवस्थेचे काम भवन विभागाकडून केल्यानंतर ते सुरू करण्यात येतील.
- श्रीनिवास कंदुल, अधीक्षक अभियंता, विद्युत विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Peshwe Energy Park Pune