पेट्रोल पंपावर वादावादी 

पेट्रोल पंपावर वादावादी 

पुणे - पेट्रोल भरण्यासाठी बुधवारी शहर व उपनगरांतील पेट्रोलपंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परंतु, "कृपया सुटे पैसे द्या किंवा पाचशे रुपयांचे पेट्रोल भरा' अशी सक्तीच पेट्रोलपंप चालकांनी केल्याने नागरिकांचे आणि पंपावरील चालकांमध्ये वादविवादाचे प्रसंग घडले. अनुचित प्रकार घडू नये म्हणून काही पेट्रोल पंपांवर पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. 

मंगळवारी (ता. 8) मध्यरात्रीपासून दैनंदिन व्यवहारांतून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या. त्याच वेळेपासून पेट्रोल पंप चालकांनी सुटे पैसे द्यावे लागतील यासाठी पाचशेच्या पटीत पेट्रोल भरण्याबाबतचे फलक लावयला सुरवात केली. मात्र, काही पंपांवर पाचशे व हजार रुपयांची नोट देऊनही शंभर ते चारशे रुपयांपर्यंतचे पेट्रोल भरून देण्यात येत होते. पाचशे आणि हजार रुपयांची नोट स्वीकारण्यात येत होती. पण सुटे पैसे नसल्याचे कारण सांगण्यात येत होते. त्यामुळे नागरिकांना मात्र बऱ्याचवेळ ताटकळत राहावे लागत होते. वादविवाद नको म्हणून काही नागरिकांनी सुटे पैसे देऊन पेट्रोल भरून घेणे पसंत केल्याचे चित्र देखील वेगवेगळ्या पंपांवर पाहायला मिळाले. 

ग्राहकांना द्यायला सुटे पैसे नाहीत, म्हणून नाइलाजास्तव पाचशे रुपये देऊन पेट्रोल भरावे लागले. परिणामी ग्राहकांची झालेली अडवणूक या सारख्या समस्यांमुळे पेट्रोल पंपांवर तणावाचे वातावरणही होते. बहुतांश वेळेला नागरिक आणि पंपावरील कर्मचाऱ्यांमध्ये वादविवादाचे प्रसंगही घडले. वेळप्रसंगी पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला. अनुचित प्रकार घडू नये यासाठी काही पंपांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दिवसभर पोलिसांचे पथकही वेगवेगळ्या पंपांवर भेटी देत होते. अनेक पंपांवर दिवसभर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

पाचशे रुपये देत आहात, तर तेवढ्याच रकमेचे पेट्रोल भरा. कारण परत देण्याकरिता सुटे पैसे नाहीत, असे सांगून पंपांवरील कर्मचारी सक्तीने पेट्रोल भरून घ्यायला लावत होते. कमी किमतीचे पेट्रोल भरून उरलेले पैसे स्वखर्चासाठी ठेवायचे म्हणून काही नागरिक शंभर, दोनशेच्या पटीत पेट्रोल भरण्याची मागणी करीत होते. तेव्हाही सुटे पैसे असतील तर पेट्रोल देऊ असेच पंपांवर कर्मचारी सांगत होते. त्यामुळे नाइलाजास्तव अधिक किमतीचे पेट्रोल भरावे लागत होते. 

केदार पिंगळे, ग्राहक 

भाजीविक्रेत्यांचाही व्यवसाय थंडावला 

""नोटा बंद केल्या, तरी व्यवसाय बंद करू शकत नाही. सकाळपासून कोणीच फिरकले नाही. सुट्ट्या पैशांसाठी पळापळ करायची का?'' अशी व्यथा भाजीविक्रेत्या नंदा मिडगे यांनी बुधवारी मांडली. मार्केट यार्ड येथील भाजी मंडई असो वा उपनगरांमधील, नोटाबंदीचा परिणाम भाजीविक्रेत्यांनाही सहन करावा लागत आहे. उधारीवर काही लोक भाज्या घेऊन जात आहेत, तर काही जण चिल्लर पैसे देऊन भाज्यांची खरेदी करत आहेत. पाचशे व एक हजार रुपयांची नोट विक्रेते स्वीकारत नसल्यामुळे ग्राहकांचीही मोठी तारांबळ उडाली. 

मार्केट यार्ड येथील भाजी मंडईसह महात्मा फुले मंडई आणि उपनगरांमधील मंडई बुधवारी ग्राहकांविना ओस पडल्या होत्या. सकाळी सकाळी काही विक्रेत्यांकडून पाचशे आणि एक हजार रुपयांची नोट स्वीकारण्यात येत होती. पण, दुपारनंतर त्यांनीही मनाई केल्याने विक्रेत्यांसह ग्राहकांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. शंभर, पन्नास, वीस व दहा रुपयांसह सुट्टे पैसे घेऊन येणाऱ्यासच भाज्या विकत दिल्या जात होत्या, तर विक्रेत्यांनी काही लोकांना नाव आणि मोबाईल क्रमांक लिहून घेत उधारीवर भाज्या दिल्या. 

भाजीविक्रेते दिनेश परदेशी म्हणाले, ""मी सकाळी मंडईमध्ये माल आणायला गेलो, तर माझ्याकडूनही पाचशे व एक हजार रुपयांची नोट किरकोळ विक्रेत्यांनी घेतली नाही. नाइलाजाने सर्व सुट्टे पैसे द्यावे लागले. ग्राहकही पाचशे व एक हजार रुपयांची नोट घेऊन येत होते. माझ्याकडेही सुट्टे पैसे नसल्याने बुधवारी व्यवसाय झाला नाही.'' 

किसन गाडेकर म्हणाले, ""आमच्याकडेही पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा आहेत. त्याचे आम्ही काय करायचे. लोकांची गरज ओळखून काहींना उधारीवरही भाज्या द्याव्या लागल्या.'' 

विक्रेत्या नंदा मिडगे म्हणाल्या, ""काही लोक सुट्टे पैसे घेऊन येत होते. काहींनी उधारीवर भाज्या नेल्या. दिवसभरात फक्त तीनशे रुपयांचा व्यवसाय झाला. नोटा बंद केल्याचा फटका व्यवसायाला झाला आहे.'' 

ग्राहक शकुंतला जाधव म्हणाल्या, ""निर्णय चांगला आहे. पण, या निर्णयामुळे लोकांची तारांबळ उडाली आहे. भाजी घेण्यासाठी घरातील सुट्टे पैसे काढावे लागले. ओळखीचे भाजीविक्रेते असल्यामुळे भाज्या त्वरित भेटल्या.'' 

मेडिकल स्टोअर्समध्ये नाकारल्या नोटा 

मेडिकल दुकानांमध्ये औषध घेण्यासाठी सकाळपासून लोकांची रांग लागली होती. पण, औषध विक्रेत्यांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. काही मेडिकल दुकानांमध्ये नोटा स्वीकारण्याच्या बदल्यात पाचशे आणि एक हजार रुपयांचे औषध अन्‌ तत्सम साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली होती. त्यामुळे औषध खरेदीसाठी आलेल्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. 

औषध विक्रेत्यांकडेही सुट्ट्या पैशाचा तुटवडा असल्याने काही लोकांना औषध न घेताच परत फिरावे लागले, तर काहींना विनाकारण पाचशे आणि एक हजार रुपयांच्या औषधांची खरेदी करावी लागली. काहींना क्रेडिट आणि डेबिट कार्ड स्वॅप करून औषधांची खरेदी करता आली. विशेष म्हणजे औषधांची तातडीची गरज असलेल्या लोकांनी 100 ते 200 रुपयांच्या औषधांची खरेदी केली. 

औषध विक्रेते रघू देवासी म्हणाले, ""सकाळपासूनच लोकांची गर्दी होत होती. त्यातही पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा घेऊन येणाऱ्यांची संख्या मोठी होती. पण, सुट्टे पैसे नसल्यामुळे लोकांना पाचशे आणि एक हजार रुपयांचे साहित्य खरेदी करावे लागले. त्याशिवाय क्रेडिट व डेबिट कार्ड स्वॅप करून औषध विकत घेणाऱ्यांचे प्रमाण मोठे होते.'' 

जयेश कासट म्हणाले, ""कोणत्याही व्यक्तींना औषधासाठी मनाई केली नाही. मात्र, सुट्ट्या पैशासाठी अडचणी आल्या. लोकांची गरज ओळखून नोटा स्वीकारल्या.'' 

ग्राहक पूनम कुलकर्णी म्हणाल्या, ""आता सुट्टे पैसे नाहीत, यात आमची व विक्रेत्यांचीही चूक नाही. पण, औषध विकत घेण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे डेबिट कार्ड स्वॅप करावे लागले. अचानक नोटा बंद केल्याचा फटका सहन करावा लागत आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com