पेट्रोलचा टॅंकर उलटल्याने वारज्यात कोंडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

कात्रज-देहूरोड पश्‍चिम बाह्यवळण मार्गावर वारजे येथे आरएमडी कॉलेजसमोर बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास  डिझेल-पेट्रोलचा टॅंकर उलटल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली.

वारजे माळवाडी - कात्रज-देहूरोड पश्‍चिम बाह्यवळण मार्गावर वारजे येथे आरएमडी कॉलेजसमोर बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास  डिझेल-पेट्रोलचा टॅंकर उलटल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली. या अपघातानंतर टॅंकरमधील इंधन रस्त्याने वाहत होते. त्यामुळे आग लागून स्फोट होण्याचा धोका लक्षात घेऊन अग्निशामक दलाने टॅंकरवर फोमचा मारा करून मोठा धोका टाळला. 

चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टॅंकर महामार्गावरून चार-पाच फुटांवरून डाव्या बाजूला सेवा रस्त्यावर खाली पडला. यात चालक आणि त्याचा सहायक किरकोळ जखमी झाला. वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांनी सांगितले.

अपघातानंतर पेट्रोल, डिझेल रस्त्याने वाहू लागल्याची माहिती नागरिकांनी पोलिस व अग्निशामक दलाला दिली. घटनास्थळी पोचल्यानंतर वाहतूक पोलिसांनी महामार्ग व सेवा रस्त्यावरील वाहतूक थांबवली. अग्निशामक दलाने तातडीने जेसीबीच्या मदतीने रस्त्याच्या कडेला खड्डे खोदले आणि पेट्रोल-डिझेल त्या खड्ड्यात वळविले. 

पेट्रोल-डिझेल सांडलेल्या ठिकाणापासून टॅंकरपर्यंत सुमारे दीड किलोमीटर अंतर होते.  कोणत्याही ठिकाणी आगीचा संपर्क झाला असता, तर ती आग टॅंकरपर्यंत पोचून स्फोट होण्याची शक्‍यता होती. हे लक्षात घेउन अग्निशामक दलाने टँकरवर फोमचा मारा केला. अपघातानंतर अग्निशामक दल, पोलिस, महापालिका आणि हवेली तहसीलदार यांच्या वतीने तलाठी संजय चोपदार 
यांनी घटनास्थळी येऊन मदतकार्य सुरू केले. 

दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
अपघातानंतर पंधरा-वीस मिनिटांत पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोचले. वाहतूक कोंडीमुळे घटनास्थळापासून दोन्ही बाजूला दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. वारजे मुख्य चौकात वाहतूक कोंडी झाली होती. परिणामी, शिवणे ते कर्वेनगर या रस्त्यावरदेखील वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक दुपारी बारा वाजता सुरळीत झाली. परंतु, अपघात घडलेल्या ठिकाणचा रस्ता व डिझेल मोठ्या प्रमाणात ज्या भागात वाहत होते तो रस्ता मात्र संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नव्हता. टॅंकर हलविल्यानंतर हा रस्ता वाहतुकीला खुला केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol tanker overturned in warje