फार्मसी सामाईक प्रवेश परीक्षा एकाच दिवशी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ बायोइन्फोर्मेटिक्‍स ऍण्ड बायोटेक्‍नॉलॉजी याबरोबरच भारती अभिमत विद्यापीठाच्या पूना कॉलेज ऑफ फार्मसीची सामाईक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) एकाच दिवशी आणि एकाच वेळी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना यापैकी एकाच परीक्षेचा पर्याय निवडावा लागणार असल्याने विद्यार्थी कोंडीत सापडले आहेत.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ बायोइन्फोर्मेटिक्‍स ऍण्ड बायोटेक्‍नॉलॉजी याबरोबरच भारती अभिमत विद्यापीठाच्या पूना कॉलेज ऑफ फार्मसीची सामाईक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) एकाच दिवशी आणि एकाच वेळी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना यापैकी एकाच परीक्षेचा पर्याय निवडावा लागणार असल्याने विद्यार्थी कोंडीत सापडले आहेत.

फार्मसी अभ्यासक्रमासाठी राज्यात नुकतीच सामाईक प्रवेश परीक्षा झाली. भारती अभिमत विद्यापीठातर्फे स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेण्यात येते. यांसह पुणे विद्यापीठातील "इन्स्टिट्यूट ऑफ बायोइन्फोर्मेटिक्‍स ऍण्ड बायोटेक्‍नॉलॉजी'ची सामाईक प्रवेश परीक्षा 10 जूनला सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत होणार आहे. देशभरातून या परीक्षांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना एकच परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची दुसऱ्या शिक्षण संस्थेची परीक्षा देण्याची संधी हुकणार आहे. या अभ्यासक्रमांसाठी मर्यादित जागा असल्याने प्रवेश परीक्षांना विशेष महत्त्व असते.

सामाईक प्रवेश परीक्षेचे नियोजन तीन महिन्यांपूर्वीच करण्यात आले होते. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांच्या तारखा आणि देशभरातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची सोय पाहून परीक्षेसाठी रविवारचा दिवस निवडण्यात आला आहे. जूनच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यापर्यंत प्रवेश परीक्षा घेण्याची मुदत असते. त्यानुसार 10 जून ही तारीख निवडली आहे.
- डॉ. अमिता रविकुमार, संचालक, इन्स्टिट्यूट ऑफ बायोइन्फोर्मेटिक्‍स अँड बायोटेक्‍नॉलॉजी

विद्यापीठ, अभिमत विद्यापीठ यांच्यामार्फत वेगवेगळ्या स्तरावर होणाऱ्या प्रवेश परीक्षांमुळे गोंधळ उडतो. म्हणूनच प्रवेशासाठी देशपातळीवर एकच सीईटी असायला हवी किंवा राज्यातील वेगवेगळ्या विद्यापीठांच्या सीईटी एकाच दिवशी येऊ नयेत, यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा.
- डॉ. आत्माराम पवार, उपप्राचार्य, पूना कॉलेज ऑफ फार्मसी, भारती अभिमत विद्यापीठ

हे करणे शक्‍य -
- एकच सामाईक प्रवेश परीक्षा असावी
- विद्यापीठ आणि अभिमत विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा एकाच दिवशी होऊ नयेत, यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा
- वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एकच परीक्षा हवी.
- ऑनलाइन प्रवेश परीक्षेचा विचार व्हावा.

Web Title: Pharmacy entrance exam for the same day