पीएच.डी. नंतर संशोधनासाठी फेलोशिप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

पुणे - पीएचडी झाल्यानंतरही पुढे आणखी संशोधन करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आता ‘पोस्ट डॉक्‍टरल फेलोशिप’ची संधी उपलब्ध करून दिली आहे. या ‘फेलोशिप’मुळे पीएचडीधारकांना पुढील संशोधनाचा मार्ग मोकळा होणार आहे.

पुणे - पीएचडी झाल्यानंतरही पुढे आणखी संशोधन करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आता ‘पोस्ट डॉक्‍टरल फेलोशिप’ची संधी उपलब्ध करून दिली आहे. या ‘फेलोशिप’मुळे पीएचडीधारकांना पुढील संशोधनाचा मार्ग मोकळा होणार आहे.

राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विद्यापीठांमध्ये अशा प्रकारची संधी उपलब्ध करून देणारे हे पहिलेच विद्यापीठ ठरल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. राज्यातील विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य, मानव्यविद्या, भाषा अशा शाखांमधील पीएचडीधारकांना पुढील संशोधनासाठी विद्यापीठात ही फेलोशिप मिळणार आहे.या फेलोशिपसंदर्भात सविस्तर माहिती ‘http://sppupdf.unipune.ac.in/’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पात्रता निकष पूर्ण असणारे विद्यार्थी १ सप्टेंबर २०१८ नंतर नावनोंदणी करू शकतात. याबाबत परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल, अशी माहिती विद्यापीठ पोस्ट डॉक्‍टरल फेलोशिप कक्षाच्या वतीने देण्यात आली. 

या ‘फेलोशिप’शी संबंधित संकेतस्थळाचे उद्‌घाटन नुकतेच विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्या हस्ते झाले. डॉ. (कॅप्टन) सी. एम. चितळे, डॉ. डी. एस. जोग, डॉ. एस. आर. गद्रे, डॉ. मनोहर जाधव, डॉ. रोहित काळे, सुबोध खिरे, सुनील होडे या वेळी उपस्थित होते.

संशोधन क्षेत्रात प्रशंसनीय काम केलेले, राज्याचे नागरिक असलेल्या अशा पीएचडीधारकांना या फेलोशिपसाठी प्रवेश मिळणार आहे. फेलोशिपसाठी प्रवेश घेताना ३२ वर्षांहून कमी वय असणे अनिवार्य आहे. राखीव जागांसाठी असलेल्या नियमांनुसार वयोमर्यादेतील सवलत कायम राहील, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. फेलोशिपद्वारे पीएचडीनंतर संशोधन क्षेत्रात सखोल काम करण्याची संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे प्रशिक्षित मनुष्यबळ अध्यापन क्षेत्राकडे वळू शकणार आहे. परिणामी, संशोधन आणि अध्यापन क्षेत्रात पुढे जाऊन भरीव काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली 
जात आहे.

Web Title: P.Hd Research Fellowship Education