पुण्यात मेट्रो पूल पडल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल; पुणे प्रशासनानं दिलं स्पष्टीकरण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 August 2020

सोमवारी (ता.२४) रात्री अचानक अनेक नागरिकांच्या व्हॉट्सअपवर पुण्यात मेट्रोचा पूल पडल्याचे फोटो व्हायरल झाले. त्यामुळे बहुतांश नागरिकांनी पोलिसांकडे चौकशी केली.

पुणे : रायगडमधील महाड येथे एक इमारत कोसळल्याची घटना एकीकडे घडलेली असतानाच दुसरीकडे वडगाव शेरी परिसरातील फिनिक्स मॉलजवळ मेट्रोचा पूल कोसळल्याचे फोटो व्हॉट्सअपवर व्हायरल झाले. दरम्यान, पोलिस अधिकाऱ्यांना फोन जाऊ लागले, मात्र संबंधीत ठिकाणी अशी घटनाच घडली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यानंतर सर्वांचाच जीव भांड्यात पडला. मात्र, ही अफवा कोणी आणि का पसरविली याचा आता पोलिस शोध घेत आहेत.

पुण्यात बाप्पांच्या विसर्जनाला कचऱ्याचे कंटेनर? मनसेच्या आरोपावर महापौरांनी दिलं उत्तर ​

महाडमध्ये इमारत कोसळल्याने त्याखाली ७० ते ८० जण अडकल्याचे तसेच त्यातील लोकांना वाचविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची (एनडीआरएफ) पथके कार्यरत असल्याच्या वृत्ताने बहुतांश नागरिकांना हादरा बसला होता. दरम्यान, सोमवारी (ता.२४) रात्री अचानक अनेक नागरिकांच्या व्हॉट्सअपवर पुण्यात मेट्रोचा पूल पडल्याचे फोटो व्हायरल झाले. त्यामुळे बहुतांश नागरिकांनी पोलिसांकडे चौकशी केली. मात्र असा काही प्रकार घडला नसल्याचे विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्यासह येरवडा पोलिसांनी स्पष्ट केले.

'नासा'ला जमलं नाही ते 'आयुका'नं करून दाखवलं; अत्यंत दूरच्या दीर्घिकेचा घेतला शोध

दरम्यान, व्हायरल झालेला तो फोटो नेमका कुठला आहे, याची तपासणी केली. त्यावेळी संबंधीत पडलेला पूल हा गुरुग्रामधील सोहना रोडवरील असल्याचे आणि तेथील एका पुलाचा स्लैब कोसळल्याची माहिती पुढे आली. तेच फोटो पुण्यातील मेट्रोचे असल्याचे भासवून व्हॉट्सअपवर व्हायरल केल्याने पोलिस अधिकाऱ्याचा चांगलाच गोंधळ उडाला.

"मेट्रोचा निर्माणाधीन पूल कोसळल्याचे छायाचित्र व्हॉट्सअपवरुन व्हायरल होत आहेत. ते फोटो पुण्यातील असल्याचा दावा केला जात असून त्यामध्ये तथ्य नाही. मेट्रोच्या अधिकाऱ्याशी मी बोललो आहे. त्यानुसार अशी घटना पुण्यात घडलेली नाही. अशा फोटो आणि मेसेजवर विश्वास ठेवू नका आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करु नका."
- मुरलीधर मोहोळ, महापौर.

बिनशर्त माफी मागण्यास प्रशांत भूषण यांचा नकार; 'मी माफी मागितली तर...'​

"व्हॉट्सअपवर फिरत असलेल्या फोटोत मेट्रो पूल पडल्याचा उल्लेख आहे. मात्र, मेट्रो पुलाचे काम रामवाडीपासून वडगाव शेरी चौकापर्यंतच आहे. फिनिक्स मॉलच्या चौकापर्यंत मेट्रोचे काम झालेले नाही, तेथे पूलच नाही, तर तो पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. व्हायरल झालेला फोटो पुण्यातला नसून अन्य ठिकाणचा आहे."
- गजानन पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विमानतळ पोलिस ठाणे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Photos of Metro bridge collapsed in Pune are going viral on social media