‘स्कायवॉक’ आयटीपर्यंत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

पुणे - वाढते प्रदूषण, वाहतूक कोंडी या समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवा भक्कम करणे गरजेचे आहे. त्यासाठी शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून (पीएमआरडीए) सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबविण्यात येत आहे. त्या मार्गिकेचे ‘स्कायवॉक’ हिंजवडी येथील आयटी कंपन्यांच्या प्रवेशद्वारापर्यंत बनविण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याची माहिती पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.

‘महामेट्रो’च्या ‘पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी’ या दोन मेट्रो मार्गिकेसह ‘पीएमआरडीए’च्या ‘शिवाजीनगर ते हिंजवडी’ या मार्गिकेचे कामदेखील होणार आहे. बालेवाडी येथील ५० एकर जागेमध्ये मेट्रोचे कारशेड उभारण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ‘स्मार्टसिटी’ आणि पीएमआरडीएच्या वतीने बालेवाडी आणि विद्यापीठ चौक येथे मेट्रो, बीआरटी आणि पीएमपी बससेवांचे ‘मल्टीनोडल हब’ बनविण्यात येणार आहेत. तसेच शिवाजीनगर येथील शासकीय गोदामाची २५ एकर जागादेखील ‘महामेट्रो’साठी हस्तांतरित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. 

‘‘शिवाजीनगर ते हिंजवडी या सुमारे २३ किलोमीटर मार्गिकेमध्ये १४ ते १५ स्टेशन आहेत. प्रत्येक स्टेशनला सायकल स्टॅंड, दुचाकी-चारचाकी पार्किंगची व्यवस्था उभारण्यात येणार आहे. तसेच आयटी कंपन्यांकडून मेट्रो स्टेशनला जोडणारे ‘स्कायवॉक’ थेट कंपन्यांच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत बनविण्याबाबतचे प्रस्ताव पीएमआरडीएकडे आले होते. त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे खासगी वाहनांची संख्या कमी होऊन मेट्रोतून प्रवास करण्याचा कल वाढेल,’’ अशी अपेक्षा गित्ते यांनी व्यक्त केली.

पीएमआरडीएच्या अतिरिक्त मनुष्यबळाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे पीएमआरडीएला तीन अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी मिळणार आहे. प्रधिकरणाला सध्या कंत्राटी तत्त्वावर मनुष्यबळ उपलब्ध झाले आहे.
- किरण गित्ते, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

Web Title: pi8mpri pune news skywalk to it