अभिनयाच्या क्षेत्रातील प्रवेश अपघाताने

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

पुणे - पोटापाण्यासाठी तुम्ही जे काम करता ती तुमची उपजीविका असते; पण मनापासून एखादे काम केले तर ती जीविका ठरते. माझ्याबाबतीत मी कलाकार म्हणून काम करताना माझी जीविकाच उपजीविका ठरली. तसेच, मी अपघाताने अभिनयाच्या क्षेत्रात आलो, असे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी आज ‘पिफ फोरम’मध्ये सांगितले. पिफचे आयोजक डॉ. जब्बार पटेल यांनी प्रभावळकर यांच्याशी संवाद साधला.

पुणे - पोटापाण्यासाठी तुम्ही जे काम करता ती तुमची उपजीविका असते; पण मनापासून एखादे काम केले तर ती जीविका ठरते. माझ्याबाबतीत मी कलाकार म्हणून काम करताना माझी जीविकाच उपजीविका ठरली. तसेच, मी अपघाताने अभिनयाच्या क्षेत्रात आलो, असे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी आज ‘पिफ फोरम’मध्ये सांगितले. पिफचे आयोजक डॉ. जब्बार पटेल यांनी प्रभावळकर यांच्याशी संवाद साधला.

या वर्षी प्रभावळकर यांना पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पिफ डिस्टिंग्विश्‍ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानिमित्ताने त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला व आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीतील अनुभव मांडले. माझ्यावर पु. ल. देशपांडेंचा प्रभाव हा खूप पूर्वीपासून आहे. विनोदातील मर्म जाणून घेऊन काम करण्याची त्यांची कला मला भावली, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. ‘बोक्‍या सातबंडे’बाबत ते म्हणाले, ‘‘नाटक, टेलिव्हिजन व चित्रपट या तिन्ही माध्यमांत काम करताना सुदैवाने माझ्याकडून लेखनही झाले.’’ विनोदाचा अतिरेक असलेल्या भूमिकांपेक्षा मिश्‍कील विनोदी व्यक्तिरेखा साकारायला जास्त आवडतात, असेही त्यांनी सांगितले.

निरागस हास्यामुळे गांधीजींच्या भूमिकेत...
‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपटातील गांधीजींच्या भूमिकेचा अनुभव सांगताना ते म्हणाले, ‘‘मला ही भूमिका अपघाताने मिळाली. मी त्या चित्रपटातील दुसऱ्या भूमिकेसाठी काम करणार होतो; पण चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी मला गांधीजींसारखा मेकअप करण्याची सूचना दिली. त्यानंतर चित्रपटाचे निर्माते विधू विनोद चोप्रा यांनी मला त्या रूपात पाहिले व माझ्या निरागस हास्यामुळे मीच गांधीजींची भूमिका साकारणार असे सांगितले.’’ कोणत्याही महान व्यक्तीची भूमिका साकारताना आधी केलेल्या तयारीचा व नंतर आलेल्या अनुभवांचा त्या अभिनेत्यावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे तो अभिनेता प्रगल्भ होतो, असेही मत प्रभावळकर यांनी मांडले. 

व्यक्तिरेखेसाठी गाठले चायनिज हॉटेल !
‘हसवा-फसवी’मधील एक व्यक्तिरेखा चिनी असल्याने त्याच पद्धतीने बोलावे व हावभाव करावे लागणार होते. ही व्यक्तिरेखा चांगली करता यावी यासाठी मी मुंबईतील ‘फ्लोरा’ या चायनिज हॉटेलमध्ये जायचो व तिथल्या चिनी वेटरचे हावभाव, बोलण्याची ढब याचे निरीक्षण करायचो, अशी आठवण त्यांनी सांगितली.

Web Title: Pif Forum dilip prabhavalkar