कबुतरांच्या ढाबळी गुन्हेगारांचे आश्रयस्थान 

कबुतरांच्या ढाबळी गुन्हेगारांचे आश्रयस्थान 

पुणे - मध्य प्रदेशातून तस्करी करून पिस्तूल विक्री करणारा मोहसीन ऊर्फ मोबा बडेसाब शेख हा सराईत गुन्हेगार. वाघोलीतील जाधववस्तीमध्ये पाळलेल्या कबुतरांच्या ढाबळीमध्ये तस्करी केलेले पिस्तूल शेख लपवून ठेवत असे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या ढाबळीतून पिस्तुलांसह काडतुसे जप्त केली. कबुतरांच्या ढाबळी गुन्हेगारांचे केवळ आश्रयस्थान ठरत आहेत. विशेषतः पोलिसांच्या वरदहस्ताने शहराच्या कानाकोपऱ्यात या ढाबळी सर्रासपणे सुरू असल्याचे भयावह वास्तव आहे.

काही महिन्यांपूर्वीच जनता वसाहतीमध्ये एका सराईत गुन्हेगाराचा त्याच्या प्रतिस्पर्धी सराईत गुन्हेगार व त्याच्या टोळीने कोयत्याने वार करून खून केला. या घटनेनंतर गुन्हेगारी टोळ्यांमधील वादांची वेगवेगळी कारणे पुढे आली. त्यामध्ये ‘कबुतरांची ढाबळ’ हेदेखील एक कारण होते. जनता वसाहतीच्या नागरिकांची वर्दळ कमी असलेल्या भागामध्ये गुन्हेगारांनी कबुतरांच्या ढाबळींच्या ढाबळी निर्माण केल्या. सराईत गुन्हेगार, त्यांचे साथीदार भेटून हफ्ते वसुली, खंडणी मागणे, एखाद्यास धमकाविणे, खुनाची सुपारी घेण्यापासून प्रतिस्पर्धी टोळीशी दोन हात करण्यापर्यंतच्या अनेक घडामोडींसाठी ढाबळ हे महत्त्वाचे केंद्र ठरत आहे. याबरोबरच पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी किंवा प्रतिस्पर्धी टोळीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठीही या ढाबळींचा उपयोग केला असल्याचे उघडकीस आले.  

केवळ एवढेच नाही, तर अल्पवयीन मुले, बेरोजगार तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठीही याच ढाबळींचा उपयोग होत असल्याचेही वास्तव आहे. पाळलेल्या कबुतरांना उडविण्याच्या, पाहण्याच्या निमित्ताने वस्त्यांमधील अल्पवयीन मुले, बेरोजगार तरुण, मद्यपी ढाबळींवर जातात. या ढाबळी सांभाळणाऱ्या ‘भाई’, ‘दादां’चे उंची राहणीमान पाहून हळूहळू ही मुले त्यांच्या संपर्कात येण्यास सुरवात होते. त्यानंतर त्या मुलांना चांगले खाणे-पिणे, कपडे, बूट संबंधित भाई-दादांकडून पुरविले जातात. त्यानंतर वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे करण्यासाठी या मुलांचा वापर केला जात असल्याची सद्यःस्थिती आहे.

शहरामध्ये गुन्हेगारांचा वावर असणाऱ्या कबुतरांच्या ढाबळी कोणकोणत्या ठिकाणी सुरू आहेत त्याची इत्थंभूत माहिती घेतली जाईल. त्यानंतर गुन्हे शाखेच्या सर्व पथकांना सूचना देऊन त्या कायमस्वरूपी बंद केल्या जातील. याबरोबरच शहरातील टेकड्या, निर्जन ठिकाणे, हडपसरमधील पॅराग्लायडिंग सेंटरचा परिसर, अशा ठिकाणी गुन्हेगारांचे वास्तव्य आहे, त्या ठिकाणीही कडक कारवाई केली जाईल.
- शिरीष सरदेशपांडे,  पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा.

इथे दिसतील कबुतरांच्या ढाबळी ! 
झोपडपट्टीतील ठराविक घरांची छते, झोपडपट्टीवरील टेकडीचा परीसर, उड्डाणपुलांच्या खालील जागा, टेकड्यांची ठिकाणे, नदीपात्रांचा परिसर, जुनी घरे, माणसांची वर्दळ कमी असणारी ठिकाणे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हेगारांकडून कबुतरांच्या ढाबळी थाटल्या जातात. काही ठिकाणी लोखंडी जाळी, पत्र्यांचा वापर करून, तर काही ठिकाणी  पक्‍क्‍या बांधकामामध्ये ढाबळ केल्या जातात. चार-पाच जण राहू शकतील, अशा पद्धतीने काही ढाबळींमध्ये तेथे व्यवस्था 
केल्याचेही चित्र आहे.


पोलिसांच्याच आशीर्वादाने वाढताहेत ढाबळी ! 
कुबतरांच्या ढाबळीमध्ये गुन्हेगारांचा वावर आणि गुन्हेगारी कारवाया वाढत असल्याची इत्थंभूत माहिती पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना असते. तरीही पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. ढाबळी व त्याच्याशी संबंधित अवैध धंद्यामुळे ‘आर्थिक’ तोडपाणी होत असल्याने पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याचे काही पोलिसांनी सांगितले.   

पोलिसांची काही ठिकाणी कारवाई 
जनता वसाहतीमध्ये एका सराईत गुन्हेगाराचा खून झाल्यानंतर पोलिस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखालील तपास पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तेथील ढाबळी शोधून काढल्या. त्यानंतर जेसीबी यंत्राच्या साह्याने त्या ढाबळी जमीनदोस्त करत काही जणांवर कारवाईही केली. मात्र, अद्यापही जनता वसाहत, दांडेकर पूल परिसरासह वेगवेगळ्या भागांतील झोपडपट्टी परिसरात ढाबळींचे आणि पर्यायाने गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com