पायलिंग मशिनचे तुटलेले भाग पडूनच

नाशिक - मेट्रो मार्गासाठी पाया खोदताना पायलिंग मशिन कोसळल्याचा निषेध करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते.
नाशिक - मेट्रो मार्गासाठी पाया खोदताना पायलिंग मशिन कोसळल्याचा निषेध करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते.

पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावर नाशिक फाटा येथे मेट्रो मार्गाच्या खांबासाठी पाया खोदताना शनिवारी (ता. ५) दुपारी पायलिंग मशिन कोसळले होते. त्याचे तुटलेले भाग रविवारी दुपारपर्यंत जागेवरच पडून होते. मात्र महामार्गासह सेवा रस्त्यावरून वाहतूक संथगतीने सुरू होती. 

कासारवाडी-नाशिक फाटा येथील दुहेरी उड्डाण पुलाजवळ मेट्रो मार्गाचे खांब उभारण्यासाठी पाया खोदण्याचे काम काही दिवसांपासून सुरू आहे. शनिवारी दुपारी एका खांबासाठी पाया खोदून झाल्यानंतर पायलिंग मशिन महामार्गावर कोसळले. त्यामुळे पुण्याकडून पिंपरीकडे येणारी वाहतूक ठप्प झाली होती.

रविवारी मशिन जागेवरच म्हणजेच महामार्ग व सेवा रस्ता यांच्यामधील भागात दोन्ही बाजूंना लोखंडी बॅरिकेड लावून पायलिंगचे काम सुरू असलेल्या ठिकाणी उभे होते. महामार्गावर पडलेले त्याचे तुटलेले भागही पायलिंगच्या ठिकाणी आणून ठेवलेले होते. दरम्यान, महामार्ग व सेवा रस्ता यांच्यामध्ये मेट्रोचे खांब उभारले जात असल्याने सेवा रस्ता खूप अरुंद झाला आहे. त्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू असते. रविवारीही दिवसभर अशीच स्थिती होती.

राष्ट्रवादीचे आंदोलन
मेट्रो मार्गाचे खांब उभारणीसाठी नाशिक फाटा येथे पाया खोदताना पायलिंग मशिन तुटल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रविवारी दुपारी घटनास्थळी आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे व नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. महापालिका व भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. साधारणतः एक तास आंदोलन सुरू होते. दरम्यान, एका पदाधिकाऱ्याच्या मोटारीच्या चालकाने मोटार रस्त्यातच उभी केली होती. सांगूनही त्याने मोटार पुढे न घेतल्याने पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. आंदोलन संपल्यानंतर समज देऊन त्याला सोडून देण्यात आले. 

अतिक्रमणे ‘जैसे-थे’
मेट्रोचे पायलिंग मशिन कोसळले त्या परिसरात सेवा रस्त्याच्या कडेला व उड्डाण पुलाच्या पिंपळे गुरवकडे जाणाऱ्या रॅम्पच्या खाली अतिक्रमणे करून अनेक दुकाने थाटलेली आहेत. ही अतिक्रमणे काढून टाकण्याची व मोकळ्या जागेत डांबरीकरण करून सेवा रस्ता रुंद करण्याची सूचना महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी अधिकाऱ्यांना केली होती. मात्र रविवारी दुपारी पाहणी केली असता अतिक्रमणे जैसे-थे असल्याचे चित्र होते. विशेष म्हणजे पुलाखाली बहुतांश दुकाने वाहनांशी संबंधित असल्याने सर्व वाहने सेवा रस्त्यावरच उभी केलेली असतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com