पिंपळगाव जोगे कार्यालय स्थलांतरास विरोध

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

कुकडी पाटबंधारे विभाग क्र.1 नारायणगाव या कार्यालयाच्या आधिपत्याखाली सुमारे पंचवीस वर्षांपासून कार्यरत असलेले येथील पिंपळगाव जोगे पाटबंधारे उपविभाग कार्यालय अळकुटी (ता. पारनेर) येथे स्थलांतरित करण्यास जुन्नर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे.

 

नारायणगाव (पुणे) : कुकडी पाटबंधारे विभाग क्र.1 नारायणगाव या कार्यालयाच्या आधिपत्याखाली सुमारे पंचवीस वर्षांपासून कार्यरत असलेले येथील पिंपळगाव जोगे पाटबंधारे उपविभाग कार्यालय अळकुटी (ता. पारनेर) येथे स्थलांतरित करण्यास जुन्नर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे.

पारनेर तालुक्‍यातील पिंपळगाव जोगे प्रकल्पाच्या सिंचन व्यवस्थापनासाठी अळकुटी येथे कार्यालय स्थलांतरित करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने 4 सप्टेंबर 2019 रोजी घेतला आहे. 11 सप्टेंबर 2019 पासून या कार्यालयाचे कामकाज अळकुटी येथे सुरू करण्याचा आदेश जलसंपदा विभागाने दिला आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी जुन्नर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्य उपाध्यक्ष अतुल बेनके यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. 9) सकाळी साडेनऊ वाजता आळेफाटा येथे आंदोलन करण्यात येणार आहे.

निर्णयानुसार होणार काय ?
जलसंपदा विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे कुकडी पाटबंधारे विभाग क्र.1 नारायणगाव या कार्यालयाच्या आधिपत्याखाली असलेल्या पिंपळगाव जोगे धरण शाखा कळंब, पिंपळगाव जोगे सिंचन शाखा पिंपळवंडी, पिंपळगाव जोगे सिंचन शाखा क्र.1 बेल्हे, पिंपळगाव जोगे सिंचन शाखा क्र.2 अळकुटी, कुकडी सिंचन शाखा अळकुटी, कुकडी सिंचन शाखा निघोज या सहा शाखा कार्यालयाचे नियंत्रण 11 सप्टेंबर 2019 पासून अळकुटी (ता. पारनेर) येथे स्थलांतरित होत असलेल्या पिंपळगाव जोगे पाटबंधारे उपविभाग अळकुटी कार्यालयांतर्गत होणार आहे. या निर्णयानुसार नारायणगाव येथील पिंपळगाव जोगे पाटबंधारे उपविभाग हे उपविभागीय कार्यालय मूळ कार्यभार व मंजूर पदांसह अळकुटी येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. उपविभागीय कार्यालयाच्या मंडळ व विभागीय नियंत्रणात कोणताही बदल करण्यात येणार नाही. स्थलांतरित कार्यालये सरकारी जागेतच कार्यान्वित करण्यात येणार आहेत. यासाठी सध्या कार्यरत असलेल्या उपविभागातील उपलब्ध साहित्याचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे प्रशासकीय व आस्थापन खर्चात वाढ होणार नाही. सुधारित रचनेनुसार 11 सप्टेंबरपासून येडगाव धरण शाखा, कुकडी सिंचन शाखा नारायणगाव, माणिकडोह धरण व कालवा शाखा माणिकडोह या विभागाचेच नियंत्रण कुकडी पाटबंधारे उपविभाग क्र.1 नारायणगाव अंतर्गत असणार आहे.

या निर्णयाचे राजकारण होता काम नये. पिंपळगाव जोगे पाटबंधारे उपविभाग कार्यालय स्थलांतरित करण्याला माझा विरोध आहे. हा निर्णय रद्द करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. कार्यालय स्थलांतरित झाले तरी पाणी वाटपाचे नियोजन नारायणगाव येथील कार्यालयातूनच होणार आहे. पिंपळगाव जोगे कालव्याच्या पोटचाऱ्यांचे काम अपूर्ण आहे. कालव्याच्या देखभालीसाठी उपविभागीय कार्यालय स्थलांतरित करण्यात आले आहे. या मुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही.
शरद सोनवणे, आमदार, जुन्नर

जुन्नर व पारनेर तालुक्‍यातील अवर्षणग्रस्त भागाला न्याय देण्यासाठी माजी आमदार वल्लभ बेनके यांनी 2005 ते 2009 दरम्यान सुमारे सत्तर किलोमीटर लांबीच्या या कालव्याचे काम पूर्ण केले. यामुळे जुन्नर तालुक्‍यातील 6 हजार 850 हेक्‍टर, पारनेर तालुक्‍यातील 4 हजार 660 हेक्‍टर शेती ओलीताखाली आली. या निर्णयामुळे जुन्नर तालुक्‍यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. शेती सिंचनाच्या प्रश्‍नाकडे आमदार शरद सोनवणे यांचे दुर्लक्ष असून याचा फटका या वर्षी जुन्नर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना बसला होता.
अतुल बेनके, राज्य उपाध्यक्ष, युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpalgao Joge Irrigation Office