पिंपरीतील पोलिस ठाणी "संपर्क क्षेत्र के बाहर' 

रवींद्र जगधने
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

रात्री-अपरात्री पीडितांना तत्काळ मदत मिळण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधण्याचे दूरध्वनी क्रमांक अद्ययावत व सार्वजनिक करणे गरजेचे आहे. अनेकदा 100 क्रमांकावर संपर्क होत नाही. पोलिस चौक्‍यांसाठीही संपर्क क्रमांक असायला पाहिजेत. 
- मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते 

पिंपरी - सध्या जगात संपर्काचे प्रभावी माध्यम म्हणून दूरध्वनीला विशेष महत्त्व आहे. मात्र सरकारी यंत्रणा याबाबत उदासीन असल्याचा प्रत्यय पोलिस ठाण्यातील बंद दूरध्वनीवरून येतो. शहरातील दोन पोलिस ठाण्यांतील दूरध्वनी बंद आहेत, तर एका ठाण्याचा दूरध्वनी खराब झाला आहे. पोलिसांशी तातडीने संपर्क साधण्यासाठीचा 100 क्रमांक अनेकदा "एंगेज' असतो, तर पोलिस ठाण्यांचे संपर्क क्रमांक पोलिसांच्या संकेतस्थळावर दिलेले आहेत. याबाबतचा सावळा गोंधळ "सकाळ'ने केलेल्या पडताळणीत उघड झाला.

दिघी पोलिस ठाणे : पोलिसांच्या संकेतस्थळावर पोलिस ठाण्याचा संपर्क क्रमांक 020-20280035 हा आहे. तो अनेकदा बंद असतो. पर्याय म्हणून दिघी पोलिसांनी 9595690704 हा क्रमांक नागरिकांसाठी सुरू केला आहे. मात्र, त्याची नोंद संकेतस्थळावर नसल्याने अनेकांना तो माहीत नाही. 

भोसरी पोलिस ठाणे : येथील दूरध्वनी खराब झालेला असल्याने अनेकदा आवाज स्पष्ट ऐकायला येत नसल्याचे खुद्द पोलिसच सांगतात. दूरध्वनी कधी दुरुस्त होणार याबाबत कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. मग, संपर्क साधायचा कसा? याचे उत्तर मिळत नाही. 

वाकड पोलिस ठाणे : यांचा 7798298558 हा क्रमांक संकेतस्थळावर दिलेला आहे. मात्र, मोबाईलचा चार्जर खराब झालेला असल्याने तो अनेक दिवसापासून बंदच आहे. सध्या 020-27261120 व 27261130 हे क्रमांक सुरू असल्याचे वाकड पोलिसांनी सांगितले. मात्र, हे नवीन क्रमांक संकेतस्थळावर उपलब्ध नाहीत. 

पोलिस चौक्‍या संपर्कापासून दूर
शहरात नऊ पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत 27 पोलिस चौक्‍या आहेत. त्यांना स्वतंत्र संपर्क क्रमांक नाहीत. संकेतस्थळावर काही चौक्‍यांसाठीचे संपर्क क्रमांक पोलिस ठाण्यांचेच दर्शविलेले आहेत, तर काही चौक्‍यांना दिलेल्या क्रमांकांची फक्त "रिंग' वाजते. ते "रिसीव्ह' केले जात नाहीत. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक पोलिसांच्या संकेतस्थळावर असतात. त्यामुळे अनेक नागरिक वरिष्ठांना संपर्क करतात. पोलिस ठाण्यातील दूरध्वनी क्रमांक संकेतस्थळावर अद्ययावत करण्याची सूचना दिली जाईल. 
- गणेश शिंदे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ तीन 

रात्री-अपरात्री पीडितांना तत्काळ मदत मिळण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधण्याचे दूरध्वनी क्रमांक अद्ययावत व सार्वजनिक करणे गरजेचे आहे. अनेकदा 100 क्रमांकावर संपर्क होत नाही. पोलिस चौक्‍यांसाठीही संपर्क क्रमांक असायला पाहिजेत. 
- मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते 

Web Title: pimpari news: police stations 'out of range'