
Police Recruitment : लढवय्या मातेचा मुलगा जिद्दीने झाला पोलिस!
पिंपरे बुद्रूक - (ता. खंडाळा जि. सातारा) येथे पारधी समाजाच्या चिमुकल्या वस्तीवर सात झोपड्या आहेत. येथील अभिता व सूरज भोसले या दांपत्याला आरती, मयुरी, मनोज आणि किर्ती अशी चार मुले. जगाच्या पाठीवर कुठेही जमीन, वशिला, आधार नाही. अशात केवळ शिक्षणच मुलांना चांगले आयुष्य देऊ शकते हे अभिता यांना ओळखले होते. त्यामुळे समाजात मुले शाळेत घालण्याबाबत उदासीनता असली तरी अभिता या प्रचंड धडपडल्या. अचानक पंधरा वर्षांपूर्वी धाकटी कीर्ती सहा महिन्याची असताना सूरज यांचा मृत्यू झाला. या जखमा अंगावर झेलूनही मुलांना शिकवायची जिद्द कायम राहिली.
जपलेल्या चाळीस-पन्नास शेळ्या विकून पैसे साठवले. शेतकऱ्यांची चिंचेची, जांभळाची झाडे खरेदी करायची आणि फळे बाजाराला नेऊन विकायची हा व्यवसाय केला. चारही मुले घरासमोरच्या जिल्हा परिषद शाळेत सातवीपर्यंत शिकविली.शिक्षकांनीही आईची धडपड पाहून सहकार्य केले. ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल घेऊन दिला. वास्तविक चार मुले शिकविणे भल्या भल्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट होती.
मावडी क.प. (ता. पुरंदर जि. पुणे) येथील अनिल चाचर हे शालाबाह्य मुले शोधून प्रवाहात आणणारे शिक्षक. कधी लोकसहभागातून कधी स्वखर्चाने ही कामगिरी पार पाडतात. पिंपरेमधील पालावर मुले शोधायला गेले असता चार मुलांना शिकविणारी आई भेटली. मुलेही कष्टाळू वाटली. मग चाचर यांनी गेली सहा सात वर्षे वह्या, दफ्तर, पाटी-पेन्सील, शैक्षणिक फी, सायकल कमी पडू दिले नाही. चाचर यांच्यामार्फत महादेव माळवदकर या शिक्षकाने आरतीचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले. आता आरती सासवडच्या हॉस्पिटलमध्ये नर्स बनली आहे. मयूरी आणि मनोज शाळेत खूपच हुशार निघाले.
मनोज धायगुडेमळा विद्यालयात दहावीला ९२ टक्के मिळवून पहिला आला. बारावी विज्ञान करून आता काकडे महाविद्यालयात प्रथम वर्ष कलाशाखेत शिकतोय. मयुरी सुद्धा काकडे महाविद्यालयात व्दितीय वर्षात शिकतेय. तर कीर्ती निरेत बारावीला आहे. महागलेले उच्चशिक्षण पेलणार नाही हे लक्षात आल्याने मनोजने अनिल चाचर यांना ‘पोलिस अकादमीत जातो आणि पोलिस होऊनच तोंड दाखवतो’ असा शब्द दिला. अनिल चाचर व रूपाली चाचर या दांपत्याने मग मनोज आणि मयूरी या दोघांनाही फलटणच्या सुभेदार पोलिस अकादमीत घातले. हे दांपत्य मनोज, मयुरीलाही दरमहा पाच हजार पाठवत राहिले. मनोज अक्षरशः झपाटला होता. नुकताच पुणे शहरात १२६ गुण घेऊन तो अनुसूचित जमातींमधून दहावा आला. मयुरीला मात्र उंचीमध्ये बाद व्हावे लागले. आता ती शासनाच्या अन्य परीक्षा देत आहे.
अभिता म्हणाल्या, सातवीपर्यंत पोरं गावात शिकली. पुढं पोरींसोबत मी पाच किलोमीटर शाळेत चालत जायचे. सोडवून परत यायचे. संध्याकाळी परत आणायला जायचे. मनोज हे बघत होता. पोलिस होण्यासाठी नदीकडनं रानोमाळ पळायचा, लिहित बसायचा. शेवटी म्हटला, घरी अभ्यास पेलणार नाही. अकॅडमीत जायचंय. मग चाचर गुरूजी देवदुतासारखं उभं राहिलं. ‘पोलिस होऊनच येतो’ असं वचन पोरगं देऊन गेलं आणि पोलिस होऊनच घरी आलं.
अन पोलिस होऊन दाखविले
मनोज म्हणाला, दोन वेळचं खायची ऐपत नव्हती. असे असताना आमच्या आईने आमच्यासाठी रात्रीचा दिवस केला. तीला सुखी बघायचं या जिद्दीमुळेच यश मिळाले. घरासाठी तातडीने नोकरी हवी होती. आता पदवी घेऊन ‘एमपीएससी’च्या परीक्षा देणार आहे. नववीपासून चाचर गुरुजींनी शैक्षणिक साहित्य कमी पडू दिले नाही. आताही वर्षभर साठ हजार खर्च केले. सोहेल सुभेदार यांनीही मदत केली.
जग झपाट्यानं बदलतंय, पण पारधी समाज अद्यापही शिक्षणाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित आहे. अजूनही ‘व्यवस्था’ त्यांच्यापर्यंत पोचण्याचे परिश्रम घेत नाही, हे वास्तव आहे. यातूनही एक सुखद बाब घडली आहे. याच समाजातील अभिता सूरज भोसले या शाळेचा लवलेशही नसलेल्या महिलेने चारही मुलांना उच्चशिक्षित करण्याचा विडा उचलला होता. पतीचे अकाली निधन झाले, पण त्या हरल्या नाही. ‘शालाबाह्य मुलांचा सखा’ अनिल चाचर या गुरूजीचा परिसस्पर्श झाला आणि त्यांचा मुलगा मनोज पहिल्याच प्रयत्नात पोलिस झाला. ही बाब समस्त वंचितांची उमेद वाढविणारी आहे.
- संतोष शेंडकर, सोमेश्वरनगर (जि.पुणे)