युतीचा काडीमोड होताच 3 नगरसेवकांची शिवसेनेला सोडचिठ्ठी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जानेवारी 2017

पिंपरी- युती तुटल्याची घोषणा गुरुवारी (ता. 26) मुंबईत होताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाच नगरसेवकांनी आज (ता.27) राजीनामे दिले. त्यात शिवसेनेच्या तीन, तर राष्ट्रवादीच्या दोघांचा समावेश आहे.

पिंपरी- युती तुटल्याची घोषणा गुरुवारी (ता. 26) मुंबईत होताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाच नगरसेवकांनी आज (ता.27) राजीनामे दिले. त्यात शिवसेनेच्या तीन, तर राष्ट्रवादीच्या दोघांचा समावेश आहे.

यानिमित्ताने "भोसरी'नंतर आता चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या पालिकेतील सत्ताधारी "राष्ट्रवादी'तील समर्थक नगरसेवकांचे भाजपमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. पाचमध्ये चार महिला असून हे सर्व येत्या दोन दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे सायंकाळी एकत्र राजीनामे दिले. यानिमित्ताने "भोसरी"तील मोठ्या "इनकमिंग'नंतर "चिंचवड'मधूनही भाजपमध्ये ते सुरू झाले आहे. येत्या दोन दिवसांत ते आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.

शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या पण तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेत राहिलेल्या, मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून भाजपचे काम करणाऱ्या सीमा सावळे आणि आशा शेंडगे यांच्यासह संगीता भोंडवे यांनी आज अधिकृतपणे शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. सावळे आणि शेंडगे यांच्या भाजप प्रवेशाची फक्त औपचारिकताच बाकी होती. भोसरीचे अपक्ष आमदार आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश लांडगे यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीतील त्यांच्या नगरसेवकांनीही मोठ्या दणक्‍यात भाजपमध्ये प्रवेश केला होता. जगताप यांच्या "चिंचवड'मधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे भाजपमध्ये इनकमिंग राहिले होते. ते आज बाळासाहेब तरस यांच्या रूपाने सुरू झाले. तर, दोन महिन्यापूर्वी भाजपमध्ये गेलेले संतोष बारणे यांच्या नगरसेविका पत्नी माया बारणे असे राजीनामा दिलेल्या "चिंचवड'मधील राष्ट्रवादीच्या दुसऱ्या नगरसेविका आहेत.

दोन दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे राजीनामा दिल्यानंतर वरील पाच नगरसेवकांनी पत्रकारांना सांगितले. शिवसेना पुन्हा पक्षात घेईल, अशी वाट आतापर्यंत पाहिली. त्यामुळे शेवटी भाजपमध्ये प्रवेश केला असे सावळे म्हणाल्या. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीनुसारच आपली वाटचाल सुरु राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडून आलेल्या प्रभागातूनच राजीनामा दिलेले पाचही जण पुन्हा भाजपतर्फे निवडणूक लढविणार आहेत. येत्या दोन दिवसांत राष्ट्रवादीचे आणखी काही नगरसेवक राजीनामे देणार असल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.

 

Web Title: Pimpri: 3 corporators divorce shivsena