राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीत आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

राज्य सहकारी बॅंकेच्या कथित कर्ज वाटप गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पिंपरी - राज्य सहकारी बॅंकेच्या कथित कर्ज वाटप गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता. २५) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करून राज्य सरकार व भारतीय जनता पक्षाचा निषेध केला.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे, पक्षाचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. नगरसेविका मंगला कदम, शीतल काटे, उषा वाघेरे, वैशाली घोडेकर, नगरसेवक दत्ता साने, मयूर कलाटे, अनुराधा गोफणे, राहुल भोसले, प्रवीण भालेकर, प्रभाकर वाघेरे, अतुल शितोळे, फजल शेख, विजय लोखंडे उपस्थित होते. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने कारवाई केली असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. राज्य सरकारचा निषेध करून प्रतीकात्मक पुतळा जाळला. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन केले. काहींनी रस्त्यावरच ठाण मांडले, तर काही जण रस्त्यावर झोपले. त्यामुळे पुणे-मुंबई महामार्गाच्या सेवारस्त्यावर आणि पिंपरी-भोसरी रस्त्यावर दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी हस्तक्षेप  करून आंदोलकांना रस्त्याच्या  कडेला आणले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

वडगावात मोर्चा
वडगाव मावळ - मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर बुधवारी (ता. २५) मोर्चा काढला. ‘इडी’ने पवार यांचे नाव त्वरित काढून न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी दिला. तालुकाध्यक्ष भेगडे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, तळेगावचे नगरसेवक किशोर भेगडे, गणेश खांडगे, अशोक घारे, दीपक हुलावळे, सुनील दाभाडे, कैलास गायकवाड, सुनील भोंगाडे, गणेश काकडे, संतोष मुऱ्हे, नारायण ठाकर, मंगेश ढोरे, नामदेव शेलार आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शरद पवार हीच सत्ताधाऱ्यांची मोठी अडचण बनल्याने व त्यांना राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा धसका घेऊन त्यांचे नाव गोवल्याचा आरोप  या वेळी करण्यात आला.  यापूर्वी पक्षातील अनेक नेत्यांना ‘ईडी’ची भीती दाखवून त्यांचे  पक्षांतर घडवून आणले, असा आरोप करण्यात आला.

‘मावळ बंद’ची आज हाक
या संदर्भात मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी (ता. २६) ‘मावळ बंद’ची हाक दिली आहे. तालुक्‍यातील सर्व व्यापारी, व्यावसायिक व कारखानदारांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri agitation of NCP