रणांगण तापतेय 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

अवघ्या 12 दिवसांवर मतदान असून, सोमवारी (ता. 7) उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर पिंपरी, चिंचवड, भोसरी व मावळ मतदारसंघांतील लढतींचे चित्र स्पष्ट झाले. चारही ठिकाणी दुरंगी लढती होणार आहेत. 19 ऑक्‍टोबरला सायंकाळी सहा वाजता प्रचार थांबणार आहे. याचा विचार केल्यास उमेदवारांना केवळ दहा दिवसांचा कालावधी प्रचारासाठी उरलेला आहे. त्यामुळे स्टार प्रचारक व नेत्यांच्या सभांची वाट पाहण्याऐवजी उमेदवारांनी आपापल्या परीने प्रचारास प्रारंभ केला आहे. 

पिंपरी : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणांगण तापू लागले असून, गेल्या दोन दिवसांत नवरात्री व दसऱ्याचा मुहूर्त साधत उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. तर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी बुधवारी (ता. 9) साधलेला संवाद, महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गुरुवारी (ता. 10) होणारा रोड शो व सभा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी (ता. 11) होणारी सभा यांची भर पडली आहे. वंचित बहुजन आघाडीसह अन्य उमेदवारांनी मतदारांशी संपर्क साधण्यावर भर दिला आहे. यानिमित्ताने स्टार नेत्यांनीही शहरावर लक्ष केंद्रित केले आहे. 

अवघ्या 12 दिवसांवर मतदान असून, सोमवारी (ता. 7) उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर पिंपरी, चिंचवड, भोसरी व मावळ मतदारसंघांतील लढतींचे चित्र स्पष्ट झाले. चारही ठिकाणी दुरंगी लढती होणार आहेत. 19 ऑक्‍टोबरला सायंकाळी सहा वाजता प्रचार थांबणार आहे. याचा विचार केल्यास उमेदवारांना केवळ दहा दिवसांचा कालावधी प्रचारासाठी उरलेला आहे. त्यामुळे स्टार प्रचारक व नेत्यांच्या सभांची वाट पाहण्याऐवजी उमेदवारांनी आपापल्या परीने प्रचारास प्रारंभ केला आहे. 

भोसरी मतदारसंघात महायुतीचे महेश लांडगे यांनी वकिलांची बैठक घेतली. दिघी, चऱ्होली, डुडुळगाव, तळवडे या समाविष्ट गावांमध्ये मतदारांशी संपर्क साधला. चिखलीतील सर्व भागांत पदयात्रा काढली. शिवसेनेचे इरफान सय्यद यांची निगडीत व रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) कार्यकर्त्यांची पिंपरीत बैठक झाली. थेरगावातील मंगल कार्यालयात शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. काहींनी प्रचारगीतांवर भर दिला आहे. 

मुख्यमंत्र्यांचा आज रोड शो 
भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी (ता. 10) मतदारसंघात रोड शो करणार आहेत. भोसरीतील पीएमटी चौकातून सायंकाळी पाच वाजता रोड शोला सुरवात होईल. दिघी रस्ता, सिद्धेश्‍वर हायस्कूल, आळंदी रस्ता, अंकुशराव लांडगे नाट्यगृह असा मार्ग असेल. 

रहाटणीत सायंकाळी सभा 
पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता रहाटणीतील कापसे लॉन्स येथे फडणवीस यांची जाहीर सभा होईल. शहराबाबतचा भाजप व महायुतीचा अजेंडा ते जाहीर करतील. 

उद्धव ठाकरे उद्या पिंपरीत 
महायुतीचे भोसरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महेश लांडगे यांच्यासह पिंपरी व चिंचवडमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा शुक्रवारी (ता. 11) पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील मैदानात सायंकाळी सहा वाजता होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri assemble