Vidhan Sabha 2019 : पिंपरी विधानसभा शिवसेनेकडेच?

Vidhan Sabha 2019 : पिंपरी विधानसभा शिवसेनेकडेच?

विधानसभा 
पिंपरी -  भारतीय जनता पक्ष- शिवसेना महायुतीच्या जागावाटपातील पिंपरी विधानसभा मतदारसंघावर शहर भाजपने दावा केला होता. मात्र, रविवारी (ता. २९) घटस्थापनेच्या मुहूर्तावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यमान आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांना ‘एबी’ फॉर्म दिला. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात असून, युती झाल्यास पिंपरी मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले.

भाजप-शिवसेनेच्या जागावाटपात पिंपरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत युती न झाल्याने भाजप व शिवसेना स्वतंत्रपणे लढले. त्या वेळी भाजपने सदर जागा मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले गट) सोडला होता. आयत्या वेळी काँग्रेसमधून पक्षात आलेले चाबुकस्वार यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. ते निवडून आले. आता पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिली आहे. मात्र, गेल्या पाच-सहा महिन्यांपासून पिंपरीवर शहर भाजपने दावा केला होता. त्यासाठी इच्छुकांची संख्याही सर्वाधिक होती. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, नगरसेवक शैलेश मोरे, बाळासाहेब ओव्हाळ, खासदार अमर साबळे यांची कन्या वेणू साबळे, राजेश पिल्ले, भीमा बोबडे, तेजस्विनी कदम, दीपक रोकडे आदी इच्छुक होते. त्या आशयाचे फलकही काहींनी संपूर्ण मतदारसंघात लावले होते. मात्र, आता त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. 

युती होणार?
भाजप-शिवसेनेच्या जागावाटपाचा तिढा सुटल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, ‘‘युतीचा आणि जागावाटपाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे.’’ ॲड. गौतम चाबुकस्वार म्हणाले, ‘‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला पिंपरी मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी एबी फॉर्म दिला आहे. युती नक्की होणार आहे. त्याची घोषणा दोन्ही पक्षांचे नेते सोमवारी (ता. ३०) करतील.’’

आघाडीचा  तिढा कायम
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जागावाटपात पिंपरी मतदारसंघावर शहर काँग्रेसने दावा केला आहे. त्या दृष्टीने त्यांनी बैठका व मेळावे घ्यायला सुरवात केली आहे. मात्र, गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मेळावा घेतला. त्यात पिंपरी, चिंचवड व भोसरीतून उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले. इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या होत्या. अद्याप उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी पिंपरीतून उमेदवार उभा करणार, की मतदारसंघ काँग्रेसला सोडणार हा तिढा रविवारी सायंकाळपर्यंत सुटलेला नव्हता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com