पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा अपुराच

Water
Water

पिंपरी - शहराला समान पाणीवाटप करण्याच्या हेतूने महापालिकेने सोमवारपासून सुरू केलेल्या ‘आठवड्यातून एक दिवस पाणी बंद’ या योजनेनंतरही अनेक भागांना कमी दाबाने पाणी मिळाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.

शहराच्या वाढलेल्या लोकसंख्येमुळे सर्व भागांना पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस एका भागातील पाणी बंद केल्यास अन्य भागांना पुरेसे पाणी देणे शक्‍य होईल, असा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केला होता. मात्र, प्रत्यक्षात त्याचा कोणताही फायदा झाला नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली.

पिंपरीतील गिरीश वाघमारे यांनी सांगितले की, आमच्या परिसरात महापालिकेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार मंगळवारी पाणी बंद होते. मात्र, सोमवारी पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होणे गरजेचे असूनही प्रत्यक्षात तसे झाले नाही. केवळ तासभर झालेल्या पाणीपुरवठ्यामुळे सोसायटीच्या टाक्‍या भरल्या नाहीत. परिसरातील अनेकांना गरजेइतकेही पाणी मिळाले नाही. पाणीपुरवठा विभागाचे हे धोरण अनाकलनीय आहे.

काळेवाडी येथील अजय वाणी म्हणाले, ‘‘आमच्याकडे सोमवारी कमी दाबाने आणि गढूळ पाणी आले. सायंकाळी सव्वापाच वाजता आलेले पाणी रात्री साडेआठपर्यंत होते. मात्र, त्याचा दाब अत्यंत कमी होता. अशीच स्थिती राहिल्यास धरण भरूनही शहर टॅंकरमुक्त होणारच नाही.’’

चिंचवड येथील अनिकेत जगताप म्हणाले, ‘‘आमच्या परिसरात नियोजनानुसार सोमवारी पाणी बंद होते. मात्र, मंगळवारीही कमी दाबाने आणि कमी वेळ पाणी आले. त्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागले.

महापालिकेने पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे आवश्‍यक आहे. बेकायदा नळजोडांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कडक कारवाई करावी.’’ डुडुळगावच्या काही भागांत कमी दाबाने, तर काही भागांत पाणीच येत नसल्याच्या तक्रारी येथील नागरिकांनी केल्या.

...अन्यथा पालिकेवर मोर्चा - राजे
पवना धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही महापालिकेने शहरात एक दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने सोसायट्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रश्‍नावर ठोस मार्ग काढण्यासाठी सोसायट्यांचे पदाधिकारी आणि रहिवासी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेवर मोर्चा काढणार आहेत. रविवारी (ता. २५) पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनच्या सभासदांची बैठक होणार असून, त्यात आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे फेडरेशनचे अध्यक्ष सुदेश राजे यांनी सांगितले. 

पवना धरण भरल्याने काही दिवसांपूर्वीच महापालिकेने पाणीकपात रद्द करत शहराला रोज पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, आठवड्याभरातच महापालिकेने हा निर्णय फिरवत पुन्हा एकदा आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सोसायट्यांना पुन्हा पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी टॅंकर मागवावे लागणार आहेत. टॅंकर लॉबीच्या फायद्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतला आहे. महापालिका प्रशासन एकीकडे २४ तास पाणी देण्याच्या वल्गना करत असताना दुसरीकडे ऐन पावसाळ्यात शहराला पाणी देऊ शकत नसल्याचे राजे यांनी सांगितले. 

सोसायट्यांना पुरेसे पाणी द्यावे, यासाठी आतापर्यंत अनेकदा महापालिका आयुक्‍तांना निवेदने दिली आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात निवेदन दिले होते. मात्र, त्यावर कोणताही तोडगा निघू शकला नाही. महापालिकेने पुन्हा एकदा लागू केलेल्या एक दिवस पाणी कपातीच्या प्रश्‍नावर महापालिकेवर मोर्चा काढून आयुक्‍तांची भेट घेणार असून, यावर तत्काळ मार्ग काढण्याची मागणी करणार असल्याचे राजे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com