पिंपरी-चिंचवड शहराला मंत्रिपदाची हुलकावणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जून 2019

शहराला लाल दिवा का नाही? 
भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचीही नावे मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत होती. कारण, त्यांच्यामुळेच महापालिकेत भाजपची प्रथमच सत्ता आली, हे सर्वश्रुत आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत मावळ व शिरूर मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांना अनुक्रमे चिंचवड व भोसरी विधानसभा क्षेत्रातून मोठे लीड मिळवून देण्यास दोघांचीही भूमिका महत्त्वाची ठरली आहे. शिवाय, जगताप यांना एकवेळ विधान परिषदेचा व दोन वेळा विधानसभेच्या कामकाजांचा प्रदीर्घ अनुभव आहे. मात्र विधानसभा निवडणूक चार महिन्यांवर आली आहे. त्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यांसाठी त्यांनी मंत्रिपद स्वीकारले नसावे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती.

आमदार जगताप आणि लांडगे यांच्या नावाची होती चर्चा
पिंपरी - अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला; परंतु शहराला मंत्रिपदाने पुन्हा हुलकावणी दिली. गेल्या दोन वर्षांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होती. त्यात भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप व त्यांच्या जोडीला महापालिकेत सत्तांतर घडवून आणण्यात मोलाची भर घालणारे भोसरीतील आमदार महेश लांडगे यांच्या नावांचा समावेश होता.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री गिरीश बापट यांना भाजपने पुण्यातून उमेदवारी दिली. ते निवडून आले. त्यामुळे त्यांच्याकडील पालकमंत्रिपद तरी शहराला मिळेल, अशी आशा होती. शिवाय बापट यांच्याकडील खात्यांचा कारभारही शहराकडे येईल, अशी चिन्हे होती.

मात्र, पुण्याचे पालकमंत्रिपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आले. त्यामुळे शहराला मंत्रिपद मिळण्याची सारी भिस्त मंत्रिमंडळ विस्तारावरच होती. मात्र, यासाठी जगताप, भेगडे यांच्यासह पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ, दौंडचे आमदार राहुल कुल, मावळचे आमदार बाळा भेगडे यांचीही नावे चर्चेत होती. अखेर भेगडे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या अपेक्षांवर पाणी फिरले. त्यामुळे शहरात निरुत्सासह नाराजीचा सूर आहे. मात्र, पक्षाशी एकनिष्ठता, प्रामाणिकपणा आणि लोकसभा निवडणुकीत मावळातील महायुतीच्या (भाजप-शिवसेना) उमेदवाराला (श्रीरंग बारणे) विजयासाठी मावळ तालुक्‍यातून २१ हजार ८२७ मतांचे लीड मिळवून दिल्याचा फायदा भेगडे यांना झाला आणि त्यांना मंत्रिपद मिळाले. 

मी मंत्रिपदासाठी इच्छुक नव्हतो. नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे व राज्य लोकलेखा समिती अध्यक्ष सचिन पटवर्धन यांच्या रूपाने शहराला यापूर्वीच तीन राज्यमंत्री दर्जाची पदे मिळाली आहेत. 
- लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष, भाजप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Chinchwad Minister Politics laxman jagtap mahesh Landage