ढगांतून स्ट्रॉद्वारे पाणीपुरवठा करा

पिंपरी - महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित अभिरूप सभेत उपस्थित (डावीकडून) पक्षनेते एकनाथ पवार (नगरसचिव), आयुक्त श्रावण हर्डीकर (महापौर), महापौर राहुल जाधव (आयुक्त).
पिंपरी - महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित अभिरूप सभेत उपस्थित (डावीकडून) पक्षनेते एकनाथ पवार (नगरसचिव), आयुक्त श्रावण हर्डीकर (महापौर), महापौर राहुल जाधव (आयुक्त).

पिंपरी - नागरिकांच्या वास्तव्यापासून एक हजार मीटरपर्यंत कुत्री व डुकरांना फिरण्यास बंदी घालणे आणि नागरिकांना थेट ढगामधून स्ट्रॉद्वारे शुद्ध पाणी घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा विषय गुरुवारी एकमताने मंजूर करण्यात आला. निमित्त होते महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित अभिरूप सभेचे. 

महाराष्ट्र महापालिकेतील ‘फायद्या’च्या नियमान्वये ‘आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय’ या गाण्याने अभिरूप सभेला सुरवात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी आयुक्त श्रावण हर्डीकर (महापौर) होते. व्यासपीठावर महापौर राहुल जाधव (आयुक्त), पक्षेनेते एकनाथ पवार (नगरसचिव) होते. सहशहर अभियंता प्रवीण तुपे (सभागृह नेते), अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे (विरोधी पक्षनेते) यांच्यासह अधिकारी विविध समित्यांचे पदाधिकारी व सदस्य म्हणून तर नगरसेवक विविध विभागांचे अधिकारी म्हणून उपस्थित होते.

शहरात चर्चेचे विषय असलेले पवना जलवाहिनी, बीआरटीएस व मेट्रो सेवा, कुत्री व डुकरांचा उपद्रव, अनधिकृत होर्डिंग आदी विषय उपरोधिकपणे विषय पत्रिकेत मांडलेले होते. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात शंभर टक्के पाणी उपलब्ध असताना शहराची तहाण भागत नाही. शंभर टक्के पाण्याचे बाष्पीभवन होते, त्यामुळे थेट ढगातून स्ट्रॉद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा. बीआरटी व मेट्रोच्या कामामुळे शहरातील रस्ते अरुंद झाल्याने नगरसेवक व कर्मचाऱ्यांना महापालिकेत येणे धोकादायक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना घराजवळील नगरसेवकांच्या कार्यालयातून काम करण्याची परवानगी द्यावी. डुकरे व कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने त्यांना नागरिकांच्या निवासस्थानापासून एक हजार मीटरपर्यंत फिरण्यास बंदी घालावी, असे विषय मंजूर करून पुढील वर्षापर्यंत सभा तहकूब करण्यात आली.

आयुक्तांची नक्कल
अभिरूप सभेत महापौर राहुल जाधव यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भूमिका साकारली. सध्या आयुक्त हर्डीकर यांनी ‘फ्रेंचकट’ दाढी राखली आहे. त्यामुळे महापौर जाधव यांनीही ‘फ्रेंचकट’ दाढी लावून आयुक्तांसारखा पेहराव केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com