सर्वांत मोठा प्रभाग अजमेरा कॉलनी, लहान गवळीनगर

सर्वांत मोठा प्रभाग अजमेरा कॉलनी, लहान गवळीनगर

पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्व नियम पाळून अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केलेली प्रभाग रचना येत्या आठवड्यात अधिकृतरीत्या जाहीर होणार आहे. दरम्यान, कोणता प्रभाग कशा पद्धतीने तयार केला आहे त्याची प्राथमिक माहिती ‘सकाळ’कडे सर्वप्रथम उपलब्ध झाली आहे.

३२ प्रभागांपैकी सर्वांत मोठा ५९ हजार मतदारांचा अजमेरा कॉलनीचा, तर सर्वांत लहान ४९ हजार मतदारांचा गवळीनगर (भोसरी) प्रभाग असणार आहे. सरासरी प्रभाग ५४ हजार मतदारांचा आहे. चारही जागा सर्वसाधारण गटासाठी खुले असणारे अकरा प्रभाग आहेत. प्रभागांचे नामकरण अद्याप बाकी आहे. ७ ऑक्‍टोबरला आरक्षण सोडतीनंतर काहीसे चित्र स्पष्ट होईल.

प्रभागरचनेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी हस्तक्षेप केला आणि आपापल्या सोयीचे प्रभाग केले, असे आरोप-प्रत्यारोप सध्या सुरू आहेत. प्रत्यक्षात प्रभाग रचना अभ्यासली असता त्यात फारसे तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले. 

जुने दोन प्रभाग जोडताना प्रशासनाची कसोटी होती. मात्र, रस्ता, चौक, नदी, नाला अशा भौगोलिक सीमांचा आणि लोकसंख्येचा विचार करूनच ही रचना केली आहे. पूर्वीप्रमाणेच प्रभाग रचनेची सुरवात तळवडे गावाकडून आणि समारोप सांगवीत झाला आहे.  

प्रभाग एक - साधारणतः तळवडे, आयटी पार्क, ज्योतिबानगर भाग, सोनवणे वस्ती, पाटीलनगर, चिखली गावठाण, गणेशनगर, मोरे वस्तीचा भाग समाविष्ट आहे. पूर्वेला इंद्रायणी नदी पासून सुरू होणारा प्रभाग दक्षिणेला चिखलीच्या साने चौकापर्यंत आहे. 

प्रभाग दोन - चिखली गावठाणाचा भाग, कुदळवाडी, जाधववाडी, राजे शिवाजीनगर आणि मोशीच्या बोऱ्हाडेवाडीपर्यंतचे क्षेत्र समाविष्ट आहे. दक्षिणेला कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंतचा परिसर आहे. 
 

प्रभाग तीन - मोशी गावठाण, डुडुळगाव, चोविसावाडी, वडमुखवाडी, चऱ्होली, गंधर्वनगरी, संत ज्ञानेश्‍वरनगरचा भाग समाविष्ट केला आहे.  इंद्रायणी नदी ते आळंदी नगरपालिका, दक्षिणेला भोसरीतील आळंदी रस्ता आणि पश्‍चिमेला पुणे-नाशिक रस्ता असा विस्तार आहे.

प्रभाग चार - दिघी, समर्थनगर, कृष्णानगर, बोपखेल, गणेशनगरचा समावेश केला आहे. पूर्वेला बोपखेलपासून उत्तरेला दिघीपर्यंत या प्रभागाचा विस्तार आहे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार चार पैकी अनुसूचित जाती आणि जमातीचे प्रत्येकी एक अशी दोन आरक्षणे आहेत.

प्रभाग पाच - भोसरीतील गवळीनगर, रामनगरी, संत तुकारामनगर, ज्ञानेश्‍वरनगर आणि चक्रपाणी वसाहतीचा काही भाग समाविष्ट केला आहे. चक्रपाणी वसाहत रस्ता ते भोसरी-दिघी रस्ता असा विस्तार आहे.

प्रभाग सहा - सदगुरूनगर, चक्रपाणी वसाहत भाग, धावडेवस्ती आणि भगत वस्तीचा समावेश आहे. पुणे-नाशिक रस्त्याने पूर्वेस वखार महामंडळाच्या उत्तर बाजूने मोशी खाणीकडे जाणारा रस्ता, दक्षिणेला भोसरी तळे, महापालिका शाळा असा विस्तार आहे. 

प्रभाग सात - सॅन्डव्हिक कॉलनी, भोसरी गावठाण, गव्हाणे वस्ती, खंडोबामाळ, शीतलबाग, लांडेवाडी आणि शांतीनगरचा समावेश आहे. पूर्व आणि दक्षिणेला सीएमई हद्द, पश्‍चिमेला लांडेवाडी चौकापर्यंत आणि उत्तरेला गुळवेवस्ती रस्त्यापर्यंत विस्तार आहे.

प्रभाग आठ - केंद्रीय विहार, जय गणेश साम्राज्य, एखंडे वस्ती, इंद्रायणीनगर, बालाजीनगर, गवळीमाथा, महाराष्ट्र कॉलनीचा समावेश आहे. उत्तरेस जाधववाडी रस्ता, पूर्वेला बाजार समिती, पश्‍चिमेला भोसरी-पिंपरी नाला हद्दीपर्यंत विस्तार आहे.

प्रभाग नऊ - अंतरिक्ष सोसायटी, विठ्ठलनगर, यशवंतनगर, नेहरूनगर, उद्यमनगर, वास्तुउद्योग, अजमेरा सोसायटी, मासुळकर कॉलनी, खराळवाडी आणि गांधीनगरचा समावेश आहे. पूर्वेला मर्सिडीज बेंझ कंपनी, पश्‍चिमेला एचए कंपनी, डॉ. आंबेकर स्मारक चौक असा विस्तार आहे.

प्रभाग १० - शाहूनगर, संभाजीनगर, एचडीएफसी कॉलनी, इंदिरानगर, दत्तनगर, विद्यानगर, लालटोपीनगर, अमृतेश्‍वर कॉलनी, म्हाडा कॉलनी आणि मोरवाडीचा समावेश आहे. पूर्वेला मोरवाडी म्हाडा ते उत्तरेला कुदळवाडी रस्ता, दक्षिणेला राका गॅस ते पश्‍चिमेला बर्ड व्हॅलीपर्यंत हा प्रभाग विस्तारला आहे.

प्रभाग ११ - कृष्णानगर, कोयनानगर, महात्मा फुलेनगर, नेवाळे वस्ती, पूर्णानगर, शरदनगर, हरगुडेवस्ती, स्वस्त घरकुल योजना, अजंठानगर, दुर्गानगरचा समावेश आहे. उत्तरेला त्रिवेणीनगर चौकापासून दक्षिणेला बजाज ऑटो कंपनी सीमाभिंत असा विस्तार आहे.

प्रभाग १२ - रुपीनगर, त्रिवेणीनगर, सहयोगनगर, ताम्हणेवस्ती भाग, म्हेत्रे वस्ती भागाचा समावेश आहे. उत्तरेला देहूरोड कॅंटोन्मेंट हद्द, पूर्वेला गजानन म्हेत्रे उद्यानासमोरील रस्ता, दक्षिणेस शिवरकर चौक असा विस्तार आहे. 

प्रभाग १३ - पेठ क्रमांक २२, यमुनानगर, निगडी गावठाणाचा समावेश आहे. 
पश्‍चिमेला टिळक चौक ते देहूरोड कॅंटोन्मेंट हद्द ते त्रिवेणीनगर चौकापर्यंत या प्रभागाचा विस्तार आहे.
-क्रमशः

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com