चापेकर बंधूंच्या क्रांतीतीर्थ स्मारकाचा होणार कायापालट

दीपेश सुराणा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

संग्रहालय, ग्रंथालय, म्युरल्सद्वारे उलगडणार ऐतिहासिक कालखंड

पिंपरी: चिंचवडगाव येथील क्रांतिवीर चापेकर बंधू यांच्या क्रांतीतीर्थ स्मारकाचा (चापेकर वाडा) कायापालट होणार आहे. स्मारकाशेजारील सात गुंठे मोकळ्या जागेत संग्रहालय, ग्रंथालय आणि म्युरल्सद्वारे ऐतिहासिक कालखंड उलगडणार आहे. संबंधित कामाचे भूमीपूजन सप्टेंबरमध्ये करण्याचे नियोजन आहे.

संग्रहालय, ग्रंथालय, म्युरल्सद्वारे उलगडणार ऐतिहासिक कालखंड

पिंपरी: चिंचवडगाव येथील क्रांतिवीर चापेकर बंधू यांच्या क्रांतीतीर्थ स्मारकाचा (चापेकर वाडा) कायापालट होणार आहे. स्मारकाशेजारील सात गुंठे मोकळ्या जागेत संग्रहालय, ग्रंथालय आणि म्युरल्सद्वारे ऐतिहासिक कालखंड उलगडणार आहे. संबंधित कामाचे भूमीपूजन सप्टेंबरमध्ये करण्याचे नियोजन आहे.

चिंचवडगाव येथील चापेकर वाड्यात सध्या स्वातंत्र्यलढ्यातील अनेक क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचा दुर्मिळ संग्रह आहे. वाड्याशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत क्रांतीतीर्थ स्मारकाचा विस्तार करण्याचे नियोजन आहे. तेथे सहा मजली इमारत उभारली जाणार आहे. सुमारे 45 हजार चौरस फूट क्षेत्राचे हे बांधकाम असणार आहे. गौतम बुद्ध यांच्या कालखंडापासून ते थेट स्वातंत्र्यपूर्व कालखंडापर्यंतचे विविध प्रसंग उलगडणारी छायाचित्रे, ऐतिहासिक संदर्भ असलेले ग्रंथ, सुमारे दोन हजार क्रांतिकारकांची सचित्र माहिती संग्रहालयाच्या स्वरूपात जतन केली जाणार आहे. शस्त्र, वस्तू आणि छायाचित्र संग्रहालय, तीनशे आसन क्षमतेचा जुन्या पद्धतीचे सभागृह आदी बाबींचा त्यामध्ये अंतर्भाव असणार आहे, अशी माहिती क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाह ऍड. सतीश गोरडे यांनी "दै.सकाळ'ला दिली.

दरम्यान, चापेकर वाड्याच्या तिसऱ्या टप्प्यातील कामासाठी वास्तुविशारद नेमण्याचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समिती सभेत आयत्या वेळी संमत झाला. संबंधित प्रकल्पाचे आराखडे व नियोजन करण्यासाठी किमया आर्किटेक्‍ट यांना वास्तुविशारद व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्त करण्यास मंजुरी दिली. संबंधित स्मारकाचा विकास राज्य सरकार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त प्रयत्नातून होईल, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी दिली.

"क्रांतीतीर्थ स्मारकामध्ये गौतमबुद्ध यांच्या कालखंडापासून ते थेट स्वातंत्र्यपूर्व कालखंडापर्यंतच्या ऐतिहासिक वस्तू, छायाचित्र, शस्त्र आदींचे संग्रहालय केले जाईल. संबंधित कामाचे भूमीपूजन सप्टेंबरमध्ये करण्याचे नियोजन आहे.''
- गिरीश प्रभुणे, अध्यक्ष, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती.

"क्रांतीतीर्थ स्मारकाचा विस्तार करताना बांधकाम सुरू असतानाच म्युरल्स, धातुकाम, सुतारकाम आणि कोरीव काम केले जाईल. देशातील सर्व प्रमुख क्रांतिकारकांची माहिती देणारे स्मारक व्हावे, या दृष्टीने प्रयत्न आहेत. 9 ऑगस्ट 2019 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.''
- ऍड. सतीश गोरडे, कार्यवाह, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: pimpri chinchwad news chaphekar bandhu memorial