लांडगे, भालेकर, कलाटे ‘स्थायी’त

pcmc
pcmc

पिंपरी - महापालिकेच्या स्थायी समितीपदी भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र लांडगे, शीतल शिंदे, संतोष लोंढे आणि आरती चोंधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर व मयूर कलाटे, शिवसेनेचे राहुल कलाटे आणि अपक्ष झामाबाई बारणे यांची शुक्रवारी सर्वसाधारण सभेत निवड झाली.

स्थायी समितीमध्ये सोळा सदस्य असून, त्यापैकी आठ सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. त्यांची निवड फेब्रुवारीमध्ये होते आणि त्यांचा कार्यकाळ एक मार्चपासून सुरू होतो. ज्या पक्षांचे सदस्य निवृत्त होतात, त्यांच्या जागी नवीन सदस्यांची नावे त्या पक्षाचे गटनेते महापौरांकडे देतात. महापौर राहुल जाधव यांनी सर्वसाधारण सभेत त्या नावांची घोषणा केली. सर्व पक्षनेत्यांनी आणि नगरसेवकांनी स्थायी समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले. 

स्थायी समितीत भाजपचे दहा नगरसेवक आणि त्यांना पाठिंबा दिलेल्या अपक्ष नगरसेवकांच्या गटाचा एक सदस्य आहे. गेल्या वर्षी भाजपने या सर्व अकरा नगरसेवकांचा राजीनामा घेतला व त्यांच्या जागी सदस्यांची निवड केली.

त्यापैकी पाच सदस्यांची आज निवड झाली. मार्चच्या स्थायी समितीच्या पहिल्या बैठकीत नवीन अध्यक्षांची निवड झाल्यानंतर भाजपचे उर्वरित सहा सदस्य स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास मार्चमध्ये स्थायी समितीतील भाजपच्या नवीन सदस्यांची निवड होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही सदस्य, तसेच शिवसेनेचे सदस्य त्यांची दोन वर्षांची मुदत संपल्यानंतर निवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी निवड झालेल्या सदस्यांना दोन वर्षांची मुदत मिळू शकेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे चार सदस्य स्थायी समितीमध्ये आहेत.

अध्यक्षपद कोणत्या गटाकडे?
राजेंद्र लांडगे, शीतल शिंदे आणि संतोष लोंढे यांच्यापैकी एकाची निवड स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी होण्याची शक्‍यता आहे. महापालिकेतील पदाधिकारी निवडताना पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांची भूमिका महत्त्वाची ठरते. गेल्या दोन्ही वर्षी जगताप समर्थकांना स्थायी समितीचे अध्यक्ष पद, तर लांडगे समर्थकांना महापौरपद मिळाले. त्यामुळे यंदा कोणत्या गटाकडे स्थायी समितीचे अध्यक्षपद जाणार, त्यानुसार नगरसेवकाचे नाव निश्‍चित होईल, अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात आहे.

करवाढ नाहीच
महापालिकेचा २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीचा मालमत्ता कर व अन्य कर प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने शुक्रवारी (ता. २२) मान्यता दिली. या वर्षी कोणतेही कर वाढविण्यात आले नसून गेल्या वर्षीचेच कराचे दर कायम ठेवण्यात आले आहेत. वृक्ष प्राधिकरण समितीच्या २८.६७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पालाही सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.

महापौर राहुल जाधव सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी होते. निवडणूक वर्ष असल्यामुळे करवाढ करू नये, अशी सत्ताधारी पक्षाची सूचना होती. गेल्याच वर्षी पाणीपट्टीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कोणतीही करवाढ नसलेला प्रस्ताव महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीपुढे सादर केला होता. स्थायी समितीच्या शिफारशीनंतर तो प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता. विरोधी पक्षनेते दत्ता साने, बाबू नायर, राहुल कलाटे यांनी वृक्ष प्राधिकरण समितीच्या अर्थसंकल्पावर बोलताना, गेल्या तीन वर्षांत किती झाडे लावली, त्यापैकी किती झाडे जगली, याची माहिती विचारली. साने म्हणाले, की महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून त्याची पाहणी करावी. कोणते वृक्ष लावणार आहात, त्याचा फायदा काय होणार, याचीही माहिती द्यावी.

माजी महापौर मंगला कदम म्हणाल्या, ‘‘झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी नागरिकांना खूप अडचणींना सामोरे जावे लागते. रस्त्यावरील दिव्यांखाली येणाऱ्या फांद्या पावसाळ्यापूर्वी कापल्यास, रस्त्यावर दिव्यांचा प्रकाश पोचेल. त्याबाबत सर्वसाधारण सभेनेच निर्णय घ्यावा. उद्यान विभागाला अधिकार द्यावेत. त्यामुळे कामांना गती मिळेल.’’ सभागृह नेते एकनाथ पवार यांनी या सूचनेला पाठिंबा दिला.

वृक्ष प्राधिकरणाने लोकसहभाग वाढवून वृक्षारोपण करावे, अशी सूचना त्यांनी केली. संदीप वाघेरे, आशा शेंडगे यांचीही या वेळी भाषणे झाली.

बाधितांसाठी ११० घरे
रस्ता व आरक्षणामुळे बाधितांसाठी ११० घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी १३.९१ कोटी रुपयांच्या खर्चासह कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पिंपरी येथे फुलबाजार सुरू करण्यासह अन्य विषयांना महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. 

महापालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंमलबजावणीचा आढावा अवलोकनासह, महापालिका कर्मचाऱ्यांचा आरोग्यविमा खासगी कंपनीमार्फत विमा योजना राबविण्यास मंजुरी दिली. महापालिकेच्या सेवेतील डॉ. पद्माकर पंडित यांची मुदत संपूनही स्थायी समितीच्या बैठकीला ते कसे उपस्थित राहिले, असा प्रश्‍न आशा शेंडगे यांनी या वेळी उपस्थित केला. त्यावर अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी पंडित यांना दोन-तीन महिन्यांची मुदत वाढवून देण्याचा प्रस्ताव तयार असल्याचे सांगितले. महापालिकेच्या सेवेत वैद्यकीय विभागाच्या विविध विभागांचे प्रमुख म्हणून मानधनाच्या तत्त्वावर कार्यरत असलेल्या डॉक्‍टरांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याच्या विषयावर वादळी चर्चा झाली.

संदीप वाघेरे यांनीही या विषयाला विरोध करीत विषय मंजूर केल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला. अखेर हा विषय तहकूब ठेवण्यात आला. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनीही या प्रश्‍नी डॉ. पंडित यांची मुदत संपली असताना प्रशासन झोपले होते का, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. शहरात नगररचना योजना लागू करणे, शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना पुन्हा शासकीय सेवेत पाठविण्याचे विषय तहकूब करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com