पिंपरी शहरातील एकमेव वर्तुळ मार्ग बंद 

पिंपरी शहरातील एकमेव वर्तुळ मार्ग बंद 

पिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) निगडी- तळवडे- देहूगाव- देहूरोड- निगडी या वर्तुळ मार्गावरील बससेवा निगडी आगाराने अवघ्या काही दिवसांतच बंद केली. त्यामुळे नागरिकांना टप्प्याटप्प्याने प्रवास करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. 

शहरातील प्रायोगिक वर्तुळमार्ग म्हणून पीएमपीने 10 ऑक्‍टोबर 2018 रोजी निगडी- देहूगाव- निगडी असा मार्ग सुरू केला. येथे दर दहा मिनिटाला बस उपलब्ध होती. निगडी- यमुनानगर- त्रिवेणीनगर- तळवडे- देहूगाव- झेंडेमळा- चिंचोली- देहूरोड- निगडी आणि निगडी- देहूरोड- चिंचोली- झेंडेमळा- देहूगाव- तळवडे- त्रिवेणीनगर- यमुनानगर- निगडी अशा पद्धतीने बस जायची. यामुळे विद्यार्थी, कामगार, रुग्ण यांच्यासह सामान्य नागरिकांची मार्गावरील इच्छित स्थळी जाण्याची सोय व्हायची. मात्र हा मार्ग 12 जानेवारी 2019 रोजी बंद करून पूर्वीप्रमाणे बस सोडल्या जात आहेत. सध्या टप्प्याटप्प्याने प्रवास करावा लागत आहे. यमुनानगरमधून चिंचोलीस जाण्यासाठी तळवडेमार्गे देहूगावला उतरून किंवा निगडीला उतरून दुसऱ्या बसने जावे लागत आहे. यामुळे प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे. 

वर्तुळ मार्गाचे उत्पन्न 
एका बसला एका फेरीत सुमारे साडेतीन हजार रुपये उत्पन्न मिळायचे. सध्या देहूरोडमार्गे देहूगाव बसला एका फेरीत सुमारे साडेतीन हजार, तर तळवडेमार्गे बसला एका फेरीत सुमारे साडेचार हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. याबाबत भक्ती-शक्ती आगार व्यवस्थापक सतीश गव्हाणे म्हणाले, ""वर्तुळ मार्गाला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नव्हता. तसेच उत्पन्नही कमी होते. त्यामुळे हा मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला.'' 

वर्तुळ मार्ग सुरू असताना वेळेत बस मिळायची. आता बसची वाट पाहत थांबावे लागते. यामुळे वेळ जास्त लागतो. वर्तुळ मार्ग पुन्हा सुरू केल्यास सर्वांची सोय होईल. 
- एस. आर. भोसले, प्रवासी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com