भाजपची पिंपरीत शतप्रतिशत कॉंग्रेसमुक्ती 

भाजपची पिंपरीत शतप्रतिशत कॉंग्रेसमुक्ती 

भाजपची शतप्रतिशतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विद्यमान अध्यक्ष अमित शहा यांनी शंभर टक्के सत्यामध्ये उतरविण्याचे प्रयत्न सुरू केलेले दिसतात. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली "शतप्रतिशत'चा श्रीगणेशा झाला. नगर परिषदांच्या निवडणुकीतील यशानंतर महापालिका निवडणुकीत राज्यातील दहापैकी आठ महापालिकांत त्याचे प्रत्यंतर आले. पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये ही घोषणा नक्कीच सत्यात उतरली आहे. एकेकाळी एकहाती सत्ता असलेली कॉंग्रेस पिंपरी- चिंचवड महापालिकेतून हद्दपार झाली आहे. 

केंद्रात, राज्यात आणि आता शहरात शतप्रतिशत भाजपची सत्ता आली आहे; पण त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "कॉंग्रेसमुक्त भारत' घोषणेचा प्रत्यय सध्या पिंपरी- चिंचवडकरांना येत आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून दिमाखात मिरवणारी कॉंग्रेस आता औषधालाही राहिली नाही. वीस वर्षांपूर्वी कॉंग्रेसची अधोगती सुरू झाली. नाही म्हणायला काही काळ प्रा. रामकृष्ण मोरे यांनी कॉंग्रेसला सावरून सत्तेत टिकवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला; पण त्यांच्यानंतर पक्ष वाचविण्याचे प्रयत्न थिटे पडले. स्वार्थासाठी पक्षाचे अनेकांनी लचके तोडले, ओरबाडले, त्यातच पिंपरी- चिंचवड कॉंग्रेस गतप्राण झाली. आता त्यात जान फुंकायची तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत कोणी नेताच शाबूत नाही. दिल्लीत राहुल गांधी जे करू शकले नाहीत, ते गल्लीतले नेते काय करणार; वरपासून खालपर्यंत सर्वच नेत्यांनी भाजप सरकारपुढे नांग्या टाकल्या आहेत. कोणी काहीच करू शकत नाही, अशी अवस्था आहे. 

शरद पवार यांच्याबरोबरीने राजकारण व समाजकारण करणारे प्रा. मोरे सामान्यांशी नाळ जोडलेले आणि नेहमी कृतिशील असत. पण, त्यांचे अनुकरण कोणी करू शकले नाही. किमान कॉंग्रेस टिकवून ठेवू असेही कोणाला वाटले नाही. ज्ञानेश्‍वर लांडगे, नाना शितोळे, हनुमंत गावडे, श्रीरंग बारणे, भाऊसाहेब भोईर अशी कितीतरी नावे घेता येतील; पण प्रा. मोरे यांच्यानंतर कोणी पक्षात टिकून राहिले नाही. 

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, पक्षात जे राहिले, त्यांना ताकद देण्याचे काम प्रदेश कॉंग्रेसने कधी केलेच नाही. मोठ्या नेतृत्वाची गरज भासली तेव्हा उपऱ्या नेत्यांनी येथे येऊन आपल्या नावाचे ढोल बडविण्यातच धन्यता मांडली. सुरेश कलमाडी, हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम यांनी येथे येऊन संघटना बळकटीसाठी प्रयत्न केले नाहीत. उलट दोन गटांत भांडणे लावून देण्यात धन्यता मानली. याच प्रवृत्तीचा फायदा घेत अजित पवार यांनी 2002 मध्ये कॉंग्रेसच्या मदतीने महापालिकेत चंचूप्रवेश केला. त्यानंतर कॉंग्रेसला सत्तेवरून दूर सारून स्वतःची सत्ता निर्माण केली. गेली दहा- पंधरा वर्षे हुकमी राज्य केले आणि सत्तेवरून आता पायउतार होताना कॉंग्रेसही नेस्तनाबूत केली. यात चूक अजित पवार यांची मुळीच नाही, तर ती कॉंग्रेस नेतृत्वाची आहे. 

गेल्या विधानसभेच्या वेळी भाऊसाहेब भोईर यांना शहराध्यक्षपदावरून हटवून सचिन साठे यांना पक्षाने प्रभारी अध्यक्ष बनविले. त्यांच्यात विरोधी पक्षनेतेपदावरून वाद सुरू झाला. वास्तविक दोघांची त्याचवेळी वरिष्ठ नेत्यांनी समजूत घातली असती, तर आज काहीसे वेगळे चित्र दिसले असते. पण, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी त्या दोहोंमध्ये समेट घडवून आणण्यापेक्षा शहरात पक्षाची वाट कशी लागेल हेच पाहिले. भाऊसाहेब भोईर यांचा अपमान झाल्याने त्यांनी निवडणूक तोंडावर येईपर्यंत शांत राहणे पसंत केले आणि वेळ येताच नऊ नगरसेवकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. सचिन साठे यांनी आपल्या ताकदीनुसार पक्ष टिकविण्याचा प्रयत्न केला. तिकीटवाटपाच्या मुलाखतीच्या दिवशी हर्षवर्धन पाटील शहरात आले. पण, त्यानंतर निवडणूक होईपर्यंत फिरकलेही नाहीत. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची सभा झाली, तीही फक्त पिंपळेनिलख या साठे यांच्याच गावात त्यांच्याचसाठी. त्यापलीकडे कॉंग्रेसचा साधा झेंडाही फडकताना प्रचारात कुठे दिसला नाही. अशोकरावांची सभा होऊनही सचिन साठे पराभूत झाले. शहरात कॉंग्रेसचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. गेल्यावेळी चौदा नगरसेवक होते. यावरूनच पक्षाची दारुण अवस्था कळते. यापेक्षा वेगळे सांगायला नको. पक्षाच्या या अवस्थेला सर्व नेतेच जबाबदार आहेत. शहरात एवढा मोठा जनाधार होता, तो पक्षाने गमावला आहे. हाताच्या बोटांवर कार्यकर्ते उरले आहेत, त्यांनाही कार्यकर्ते म्हणायचे की नाही अशी स्थिती आहे. 

पक्षाने शहरातील जनाधारच नव्हे तर विश्‍वासही गमावला आहे, हेच यावरून सिद्ध होते. भाजपने शून्यातून सत्ता मिळवली, कारण नेते खंबीर आहेत. राष्ट्रवादीच्या पराभवानंतर शरद पवार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना फोन करून आत्मविश्‍वास वाढविण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेसकडे तर तसे कार्यकर्तेही नाहीत आणि नेताही नाही. पक्ष आहे आत्मविश्‍वास गमावलेल्या एखाद्या मुर्दाड सापळ्यासारखा, ज्यात जान नाही. पराभूत मानसिकतेचे हे लक्षण आहे, दुसरे काय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com