पिंपरीच्या आयडीटीआरची केरळला भुरळ

सुधीर साबळे
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

पिंपरी - वाहनांच्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी चालकांना अत्याधुनिक पद्धतीचे प्रशिक्षण देण्यासाठी पिंपरीत चालविण्यात येणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरची (आयडीटीआर) भुरळ केरळ राज्याला पडली आहे. नुकतेच केरळ राज्याचे परिवहनमंत्री ए. के. शशिधरन, परिवहन विभागाचे मुख्य सचिव ज्योतीलाल आणि आयुक्‍त पद्मनाभन यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेला भेट देऊन त्यासंदर्भातील प्रस्ताव सादर केल्याचे संचालक कॅप्टन डॉ. राजेंद्र सनेर पाटील यांनी ‘सकाळ’ला सांगितले.  

वाहनचालकांना प्रशिक्षण देण्यासाठी केरळने आपल्या राज्यात ६२ ठिकाणी ही सुविधा उभी करण्याचे नियोजन केले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था केरळमध्ये हा उपक्रम राबविण्यासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून काम करणार आहे.  

आयटीडीआरमध्ये वाहन चालविण्याचा परवाना स्वयंचलित पद्धतीने देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. परवाना देताना संबंधित व्यक्‍ती कशा पद्धतीने वाहन चालवते याची कॅमेऱ्यात नोंद होते. त्यासाठी व्हिडिओ ॲनलेटिक टेक्‍निकच वापर करण्यात येतो. या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची केरळ सरकारची योजना आहे. सध्या तिथे होणारी वाहनांची तपासणी मॅन्युअल होते. सीआयआरटीने नाशिकमध्ये वाहनांचे स्वयंचलित पद्धतीने तपासणी करणारे फिटनेस सेंटर उभे केले आहे. तसे सेंटर उभे करण्याचा केरळ सरकारचा मानस आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी चालकांना नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे प्रशिक्षण देण्यात येते. तसेच येथे राबविण्यात येणाऱ्या निवासी अभ्यासक्रमांना देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी केरळ राज्याने आयटीडीआरसारखी केंद्रे राज्यातील अनेक भागांत सुरू करण्याचे नियोजन आहे. केंद्रे सुरू झाल्यानंतर वाहनचालकांना शास्त्रीय पद्धतीने प्रशिक्षण देणे सहज शक्‍य होणार आहे. त्यामुळे अपघात कमी होण्यास मदत होईल. 
- कॅप्टन डॉ. राजेंद्र सनेर पाटील, संचालक, सीआयआरटी

केरळमध्ये प्रस्तावित असणारी आयटीडीआर सेंटर उभी करण्यासाठी सीआयआरटीकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या सोयीसुविधा आणि वाहनचालकांना कसे प्रशिक्षण द्यावे हे सांगण्यात येणार आहे. 
- समीर सत्तीगेरी, सर्टिफिकेशन विभागप्रमुख, सीआयआरटी

Web Title: Pimpri IDTR Keral Vehicle Accident