रेल्वे प्रवाशांसाठी सुखद गारवा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

पिंपरी - तुम्ही जर लोकल किंवा रेल्वेने लोणावळ्याकडे जात असाल तर पिंपरी स्टेशनपासून पुढे तुम्हाला लोहमार्गाच्या दोन्ही बाजूला गर्द हिरवाईचा अनुभव घेता येईल.

पिंपरी ते लोणावळा दरम्यान असणाऱ्या लोहमार्गाच्या दोन्ही बाजूला १५ मीटर जागा सोडून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वेतर्फे अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच राबवण्यात येत असून येत्या पाच जूनपासून त्याची सुरवात होईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला शनिवारी सांगितले.

पिंपरी ते लोणावळा दरम्यान लोहमार्गाच्या दोन्ही बाजूला सध्या मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला असतो. रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या मंडळींना त्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. या मार्गावर वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने या संपूर्ण मार्गाचे सर्वेक्षण गेल्या आठवड्यात केले. लोहमार्गाच्या दोन्ही बाजूला रेल्वेची जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. हा परिसर पूर्णपणे चकाचक करून त्याठिकाणी फुलझाडे लावण्याचे नियोजन केले आहे. रेल्वे रुळालगत मोठी जागा असलेल्या ठिकाणी बहावा किंवा अन्य मोठी शोभेची झाडे लावण्यात येतील.

पावसाळ्यात ही मोहीम पूर्ण करण्यात येईल. लोहमार्गालगत झाडे लावण्याची मोहीम रेल्वे प्रशासनाकडून राबवण्यात येणार असली तरी या उपक्रमात शहरातील सामाजिक संस्था, पर्यावरण क्षेत्रातील संस्था, औद्योगिक कंपन्या यांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. पुणे ते लोणावळा मार्गावर उपनगरी रेल्वेसाठी तिसरा आणि चौथा ट्रॅक टाकण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

या कामासाठी आवश्‍यक असणारी जागा सोडून त्याठिकाणीदेखील वृक्षारोपण करण्यात येणार आहे. उपनगरी रेल्वेच्या ट्रॅकचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर धावणाऱ्या लोकल गाड्या गर्द झाडांच्या छायेतून ये-जा करतील. 

रेल्वेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, देहूरोड या लोहमार्गाच्या बाजूला कचरा पडल्याचे दिसून आले. याखेरीज अनेक ठिकाणच्या संरक्षक भिंतीदेखील प्रवाशांनी ये-जा करण्यासाठी तोडल्या आहेत, त्याची दुरुस्ती रेल्वेकडून करण्यात येईल. लोहमार्गालगत वृक्षारोपण करण्याचा रेल्वेचा उपक्रम यशस्वी होईल, असा आमचा विश्‍वास आहे. 
- कृष्णाथ पाटील,  वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक, मध्य रेल्वे, पुणे विभाग

परिसर आल्हाददायक
पिंपरी ते लोणावळा दरम्यानच्या लोहमार्गालगत वृक्षारोपण केल्यामुळे हा परिसर आल्हाददायक राहणार असून प्रवाशांना फायदा होणार आहे.

Web Title: Pimpri to lonavala railway passengers experience the dark green