पिंपरीचे महापौर कुणबी मराठाच; पुणे जिल्हा जात समितीचा निकाल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

महापौरांसह पिंपरी पालिकेच्या 17 नगरसेवकांविरुद्ध समितीकडे तक्रार
करण्यात आली होती. महापौर वगळता इतर प्रकरणी क्‍लीन चीट देत समितीने
महापौरांविरुद्धचीच तक्रार दाखल करून घेतली होती. त्यावर अंतिम सुनावणी 3
ऑगस्टला पूर्ण झाली. 11 तारखेला समितीने अध्यक्ष डॉ.सदानंद पाटील,सदस्य
व्ही.ए.पाटील आणि सदस्य सचिव व्ही. आर. गायकवाड यांनी निकाल दिला.

पिंपरी : इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गासाठी राखीव जागेवर कुणबी
म्हणून निवडणूक लढवून विजयी झालेले पिंपरी- चिंचवडचे भाजपचे महापौर नितीन
काळजे यांचे कुणबी जात प्रमाणपत्र पुुणे जिल्हा जात पडताळणी समितीने
ग्राह्य धरले आहे. त्यामुळे ते डेंजर झोनमधून बाहेर पडले आहेत.कुणबी
मराठा म्हणून ओबीसी जागेवरून निवडून आलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील
इतर 16 नगरसेवकांना अगोदरच "क्‍लीन चीट' मिळाली असल्याने शहरातील सर्वच
नगरसेवकांवरील कुणबी दाखल्याची टांगती तलवार आता दूर झाली आहे.

महापौरांसह पिंपरी पालिकेच्या 17 नगरसेवकांविरुद्ध समितीकडे तक्रार
करण्यात आली होती. महापौर वगळता इतर प्रकरणी क्‍लीन चीट देत समितीने
महापौरांविरुद्धचीच तक्रार दाखल करून घेतली होती. त्यावर अंतिम सुनावणी 3
ऑगस्टला पूर्ण झाली. 11 तारखेला समितीने अध्यक्ष डॉ.सदानंद पाटील,सदस्य
व्ही.ए.पाटील आणि सदस्य सचिव व्ही. आर. गायकवाड यांनी निकाल दिला. काळजे
यांनी कुणबी असल्याचे दाखल केलेले दस्ताऐवज सबळ व विश्‍वासार्ह असल्याचे
समितीने निकालात म्हटले आहे.तर, तक्रारदारांना काळजे हे कुणबी नसल्याचे
सिद्ध करण्यात अपयश आल्याचे निकालात नमूद करण्यात आले आहे.दरम्यान
निकालावर महापौरांनी आनंद व्यक्त केला. खरे ते खरे ठरल्याचे ते
म्हणाले.तर, या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे
तक्रारदार आणि आरटीआय कार्यकर्ते मृणाल ढोले-पाटील यांनी सांगितले.

इतर मागासवर्गीयांसाठी राखीव प्रभागातून (क्र.तीन अ) काळजे हे निवडून आले
आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे घनश्‍याम खेडकर यांनी काळजे
यांचा कुणबी जातीचा दावा खोटा असल्याचे सांगत त्यांच्या जात
प्रमाणपत्राला आव्हान दिले होते. नंतर ढोले-पाटील हे सुद्धा या प्रकरणात
तक्रारदार झाले होते.

Web Title: Pimpri Mayor Nitin Kalje is Kunbi Maratha; Results of Pune District Caste Committee