पिंपरी पालिकेत विरोधक आक्रमक

Municipal
Municipal

पिंपरी - सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकासह विरोधी सदस्यांनी सूचविलेले व प्रशासनाकडून आलेले ऐन वेळचे विषय स्वीकारण्यास महापालिका स्थायी समिती अध्यक्षकांनी विरोध केला. त्यावरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी सभागृहाच्या प्रवेशद्वारात धरणे धरले. ‘अखेर सर्वच विषय विषयपत्रिकेवर घेऊ, ऐनवेळचे कोणतेही विषय स्वीकारणार नाही,’ असा अध्यक्षांचा निरोप मिळाल्यानंतर सभेचे कामकाज सुरू झाले.

महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा नियोजित वेळेनुसार बुधवारी (ता. ११) दुपारी अडीच वाजता होती. मात्र, महापालिकेने पिंपरी चौकात उभारलेल्या भीमसृष्टीचे उद्‌घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमासाठी आयुक्तांसह स्थायी समितीचे पदाधिकारी व काही अधिकारी उपस्थित राहिले. कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता संपला. त्यानंतर सर्व जण महापालिकेतील स्थायी समिती सभागृहात आले. विषय पत्रिकेवर ३४ कोटी रुपयांचे ८३ विषय मंजुरीसाठी होते. त्यात ऐनवेळच्या सुमारे ८० विषयांची भर पडली. मात्र, अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी पाच-सहा विषय स्वीकारण्यास नकार दिल्याचे भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काटे, स्थायी समिती सदस्य मयूर कलाटे व शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी सांगितले व सभागृहाच्या प्रवेशद्वारावर धरणे धरले. ‘तुमच्याबरोबर भूमिपुत्रांशी संबंधित विषयही मंजूर करा; अन्यथा सर्वच विषय ‘विषयपत्रिके’वर येऊ द्या, आयत्या वेळचे कोणतेही विषय घेऊ नका,’ अशी भूमिका त्यांनी मांडली. सुमारे अर्धा तास यावरून गोंधळ सुरू होता. अखेर भाजपचे स्थायी समिती सदस्य सागर अंगोळकर यांनी प्रवेशद्वारावर येऊन ‘सर्वच विषय पत्रिकेवर घेऊ’, असा निरोप दिल्यानंतर विरोधी सदस्य सभागृहात गेले व कामकाज सुरू झाले.

तेवीस कोटींच्या कामांना स्थायी समितीची मंजुरी
पिंपरी - क्रीडा धोरणातील खेळाडू दत्तक योजनेअंतर्गत निवड झालेल्या २३ पात्र खेळाडूंना दत्तक योजनेचा एक वर्षासाठी लाभ मिळणार आहे. त्यासाठी सुमारे ३२ लाख ४४ हजार रुपये खर्च होणार आहेत. यांसह महापालिकेच्या विविध विकास कामांसाठी येणाऱ्या २२ कोटी ५५ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समिती सभेने मंजुरी दिली. 

अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. दिघीतील माउलीनगरजवळ लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) भिंतीच्या कडेने मुख्य नलिका टाकण्यासाठी २५ लाख ९३ हजार रुपये, भाटनगर विद्युत दाहिनीच्या वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी ३२ लाख ९३ हजार रुपये आणि खंडोबामाळ टाकीवरून पाणीपुरवठा व्यवस्थापनासाठी ४४ लाख २५ हजारांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली. प्रभाग दोन, नऊ आणि ३२ मधील विविध कामांसाठी अनुक्रमे २८ लाख ४४ हजार, ९१ लाख आणि २६ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com