पालिका अर्थसंकल्पावर पूर्णतः भाजपची छाप?

pcmc
pcmc

पिंपरी - महापालिकेत गेले वर्षभर निरंकुश सत्ता असूनही भाजपला स्वतःची अशी छाप पाडता आलेली नाही. आता आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाची संधी साधून विविध आकर्षक योजनांसाठी भरघोस तरतूद करून स्वतःचा ठसा उमटविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. नवीन उपक्रमांचे फुले, शाहू, आंबेडकर यांच्यासह स्वातंत्र्यवीर सावरकर, हुतात्मा चापेकर, दीनदयाळ उपाध्याय, श्‍यामाप्रसाद मुखर्जी असे नामकरण करण्यात येणार आहे. 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत यापूर्वी सलग सतरा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद सत्ता होती. शहरातील जवळपास सर्वच प्रकल्पांची भूमिपूजन आणि उद्‌घाटन फलकावर शरद पवार आणि अजित पवार यांची नावे कोरलेली आहेत. या काळात स्वस्त घरकुल, झोपडपट्टी पुनर्वसनासह रस्ते, पूल, उड्डाण पूल, समाज मंदिरे, उद्याने असे अनेक महत्त्वाचे प्रकल्प झालेत. महिला बालकल्याण आणि समाजकल्याण विभागामार्फत विविध योजनांची रेलचेल होती. मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, महिला बचत गटांसाठी अनुदान तसेच प्रशिक्षण, विधवा व परित्यक्तांना अनुदान आदी योजनांमुळे तळागाळातील वर्ग थेट राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडला गेला होता. निवडणुकीतही त्याचा चांगलाच लाभ होत असे.

वर्षापूर्वी राष्ट्रवादीची सत्ता गेली आणि भाजपची सत्ता आली. मात्र सर्व प्रकल्प, योजनांवर आजही राष्ट्रवादीचे नाव कायम आहे. हा शिक्का पुसण्यासाठी भाजपने नामी शक्कल लढवली आहे. केंद्र आणि राज्य सरकारप्रमाणे योजनांना नावे देण्यात येणार आहेत. त्यात प्रमुख जाती धर्माच्या घटकांना खूष करण्याचा प्रयत्न आहे. 

शिवसेनेसाठी बाळासाहेबांचेही नाव
भाजप आणि शिवसेना यांच्यात वितुष्ट आले आहे. शिवसेनेने आगामी सर्व निवडणुका स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी झालीच, तर आगामी काळात पुन्हा भाजप-शिवसेनेशी युती अपरिहार्य आहे. हे ओळखून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देऊन शिवसेनेला चुचकारण्याचेही राजकारण भाजप करू पाहत आहे.

महापुरुषांच्या नावांचा प्रस्ताव
छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज या राष्ट्रपुरुषांशिवाय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, हुतात्मा चापेकर बंधू, दीनदयाळ उपाध्याय, श्‍यामाप्रसाद मुखर्जी, अहल्याबाई होळकर, धोंडो केशव कर्वे, लहुजी वस्ताद, अण्णा भाऊ साठे, पंडिता रमाबाई, अण्णासाहेब पाटील यांच्यासह माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने योजना जाहीर करण्याचा प्रस्ताव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com