गर्भपातास नकार देणाऱ्या डॉक्‍टरवर पिंपळे गुरवमध्ये हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

नवी सांगवी - पाच महिन्यांच्या गर्भवती असलेल्या अविवाहित युवतीचा गर्भपात करण्यास नकार दिला म्हणून पिंपळे गुरव येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्‍टरवर अज्ञात युवकाने कोयत्याने हल्ला केल्याची घटना शनिवारी (ता. ९) रात्री दहाच्या सुमारास  घडली.

नवी सांगवी - पाच महिन्यांच्या गर्भवती असलेल्या अविवाहित युवतीचा गर्भपात करण्यास नकार दिला म्हणून पिंपळे गुरव येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्‍टरवर अज्ञात युवकाने कोयत्याने हल्ला केल्याची घटना शनिवारी (ता. ९) रात्री दहाच्या सुमारास  घडली.

डॉ. अमोल बिडकर असे हल्ला झालेल्याडॉक्‍टरांचे नाव असून, याबाबत त्यांनी सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे, की डॉ. बिडकर यांचे काटेपुरम चौकात रुग्णालय आहे. साधारण पंधरा दिवसांपूर्वी एक अविवाहित जोडपे एका मध्यमवयीन युवतीला बरोबर घेऊन त्यांच्याकडे गर्भपात करण्यासाठी आले होते. ती युवती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आल्यावर डॉ. बिडकर यांनी १२ आठवड्यांपेक्षा जास्त दिवसांचा गर्भ असल्यास गर्भपात करता येत नाही असे सांगून त्यास नकार दिला.

शनिवारी रात्री दहाच्या सुमारास हल्ला करणारा तरुण आपल्या मित्रासह त्यांच्या केबिनमध्ये आला व खूपच विनवणी करू लागला. परंतु याही वेळेस डॉक्‍टरांनी त्याला ठाम नकार दिला असता, त्याने त्यांच्यावर कोयत्याने वार केले. डॉक्‍टर बिडकर यांच्या हातात मोबाईल असल्याने त्यांनी तो वार त्यावर झेलला, त्यामुळे त्यांच्या हाताचा पंजा वाचून किरकोळ दुखापत झाली. दुसरा वार खांद्यावर केला असता तोही त्यांनी हुकविल्याने ते बचावले. दरम्यान, या घटनेचा सांगवी, पिंपळे गुरव डॉक्‍टर असोसिएशनच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. सुनील पाटील, डॉ. प्रदीप ननावरे, डॉ. मंगलमूर्ती भालेराव, डॉ. पवन लोढा, केमिस्ट असोसिएशनचे महेंद्र लंभाते यांच्यासह स्थानिक नगरसेवक शशिकांत कदम, सागर आंघोळकर व परिसरातील सर्व डॉक्‍टर, औषध विक्रेत्यांनी सांगवी पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपींचा त्वरित छडा लावून अटक करण्याची मागणी केली. तर, पिंपरी- चिंचवड डॉक्‍टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रेय कोकाटे यांनीही याचा निषेध केला.

Web Title: pimpri news Abortion doctor