वकिलांनो, कायद्याची बूज राखा 

वकिलांनो, कायद्याची बूज राखा 

पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्‌स बार असोसिएशन या वकिलांच्या संघटनेची वार्षिक निवडणूक नुकतीच झाली. पिंपरी न्यायालयाच्या बाहेरचा परिसर बेकायदा होर्डिंग्ज, बॅनरने रंगून गेला होता. निवडणुकीला उभे असणाऱ्या वकिलांनीच स्वतःची छबी असलेली भली मोठी होर्डिंग्ज प्रचारासाठी लावलेली पाहून नागरिकांनाही आश्‍चर्याचा धक्का बसला. प्रतिस्पर्धी उमेदवारांची टर्र उडविणारा प्रचारसुद्धा सोशल मीडियावर झाला. एसएमएस, व्हॉटस्‌ॲप, फेसबुकवर ते दिसते. यंदाची वकिलांची ही निवडणूक अगदी हद्द झाली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

बेशिस्त अन्‌ फटाक्‍यांची आतषबाजी 
ज्यांनी स्वतः कायद्यानुसार वर्तन करणे अपेक्षित आहे आणि लोकांनाही कायदा पाळायला सांगायचा त्यांचेच वर्तन आक्षेपार्ह होते. या निवडणूक प्रचारासाठी काही वकील मित्रांनी न्यायालयाच्या दारातच धरणे आंदोलनासारखी गर्दी केलेली दिसली. प्रवेशद्वारासमोरच्या रस्त्यावर आणि चौकात आडवी तिडवी वाहने लावल्याने ये जा करणाऱ्यांना अक्षरशः कसरत करावी लागली. वाहतूक कोंडीही झाली होती. कहर म्हणजे रात्री पावणेअकरा वाजता निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर दोन हजार फटाक्‍यांची माळ लावून आतषबाजीही झाली. वकील मित्रांनी राजकारण्यांवरही मात केली. आजकाल बिघडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीला असतो तसा माहोल होता. अनेक सुसंस्कृत वकिलांना हे रुचलेले नाही. मात्र, त्यांनीही दुर्लक्ष केले. गेल्या पाच दहा वर्षांतील काही निवडणुका पाहिल्या तर अलीकडे या निवडणुकीला लागलेले अनिष्ट वळण नको नकोसे वाटते. यात सुधारणा झाली पाहिजे. वकिलांची ही असली निवडणूक त्यांच्या पेशाला शोभनीय नाही. लोकशाहीचा आदर करणारे नागरिक मोठ्या अपेक्षेने त्यांच्याकडे पाहतात; पण त्यांनीच ताल सोडला आहे. शहरात आजही सज्जन वकील मोठ्या संख्येने आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन दिशा देण्याचे काम केले पाहिजे. लोकांना ज्यांनी आदर्श घालून द्यायचा त्यांनीच नियम, संकेत पायदळी तुडवले तर कठीण आहे.  

चांदीची नाणी, ओली पार्टीसुद्धा?
नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत मतदारांना आकृष्ट करण्यासाठी किमती भेट वस्तू दिल्या गेल्या. त्या वेळी निवडणुकीचा अक्षरशः बाजार झाला होता. मतदारांना पैशाचेही वाटप झाले. ओल्या पार्ट्यांचा रतीब अनेकांनी अनुभवला. ज्येष्ठांना आणि कार्यकर्त्यांना कोकण, गोवा, अष्टविनायक, बालाजी अशा सहलींची मेजवानी मिळाली. आता अगदी त्याच वळणावर वकिलांची निवडणूक गेल्याने प्रकरण गंभीर आहे. वकिलांपैकी एका उमेदवाराने काही निवडक मतदारांना चांदीची नाणी भेट दिल्याची चर्चा रंगली आहे. लेखी तक्रार आली नाही, असे निवडणूक अधिकारी सांगतात. प्रतिस्पर्धी उमेदवार हा आरोप खोडूनही काढतात. निव्वळ बदनामीचा हा प्रकार असल्याचा युक्तिवाद काही वकिलांनी केला आहे. आजवरच्या वकिलांच्या निवडणुका पाहिल्या. निकालानंतर ओल्या पार्टीची प्रथाच सुरू झाल्याचे सत्य नाकारून चालणार नाही. एकमेकांना धडा शिकविण्यासाठी काही वकिलांनी त्याचे चित्रणही केले. निवडणुकीत हा त्या कॉलेजचा, तो त्या कॉलेजचा असे गट तट झाल्याचे दिसले. काही नवीन वकिलांनी अतिउत्साहाच्या भरात गटनिहाय प्रचार केला. त्यातून संघटनेतही फूट पडली. या पेशात येणाऱ्या नवीन वकील मित्रांसाठी हा प्रकार योग्य नाही. एकूणच लोकशाहीतील निवडणूक पद्धतीला काळिमा फासणारा हा प्रकार आहे. कोणत्याही परिस्थितीत हे प्रकार थांबले पाहिजेत. 

आदर्श आचारसंहिता ठरवा 
सर्व निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता असते. वकिलांचा त्याला अपवाद नसावा. प्रत्येक पेशासाठी एक संहिता असते. वकिलांसाठीच्या संहितेनुसार कसे वागावे, कसे बोलावे याचेही नियम घालून दिले आहेत. समाजात या पेशाबद्दल आजही बऱ्यापैकी आदर टिकून आहे, तो कायम राहिला पाहिजे. किमान यापुढील काळात वकिलांच्या निवडणुकीत होर्डिंग्ज, बॅनर्स लागणार नाहीत, आमिष दाखविले जाणार नाही, पार्ट्या अथवा भोजनावळी नसतील असे काही नियम केले पाहिजेत. शहरात दोन हजारांवर वकील आहेत. त्यांनी मनात आणले तर फक्त वकिलांच्याच नाही तर शहरात होणाऱ्या सर्वच निवडणुकांबाबत परिवर्तन शक्‍य आहे. ज्येष्ठ, श्रेष्ठ, मान्यवर वकिलांनी लक्ष घातले तर इथे क्रांती होईल. समाजात एक चांगला संदेश जाईल. वाईटातून चांगले घडत असेल तर सर्व नागरिक साथ देतील. किमान प्रयत्न करायला हरकत नाही. फक्त डोळ्यांवर पट्टी ओढून चालणार नाही. वकिलांची संघटनासुद्धा हे करू शकते. त्यासाठी शुभेच्छा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com