संमेलनामुळे मुलांच्या विचारांची मशागत

संमेलनामुळे मुलांच्या विचारांची मशागत

पिंपरी - ‘‘आज साहित्यिक खूप झाले आहेत; परंतु साहित्यप्रेमींची संख्या कमी होतेय. बालकुमार साहित्य संमेलनामुळे मुलांच्या विचारांची मशागत होऊन त्यांच्याकडून उत्तम साहित्य निर्माण होईल,’’ असा विश्‍वास ज्येष्ठ साहित्यिक व समाजसेवक गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भोसरी शाखेतर्फे मोहननगर- चिंचवड येथील श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात आयोजित बालकुमार साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी प्रभुणे बोलत होते. लक्ष फाउंडेशनच्या अनुराधा प्रभुदेसाई संमेलनाध्यक्ष होत्या. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उपमहापौर शैलजा मोरे, स्वागताध्यक्ष माजी सैनिक रामचंद्र (अण्णा) जाधव, निमंत्रक पुरुषोत्तम सदाफुले, मुख्य कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार, सुदाम भोरे, उद्धव कानडे, नगरसेविका प्रियांका बारसे, ॲड. सतीश गोर्डे, रोहित खर्गे, राजेंद्र वाघ, जयवंत भोसले आदी उपस्थित होते. 

संमेलनाच्या प्रारंभी लेझीम आणि ढोल- ताशांच्या गजरात मोहननगर ते शाळेच्या प्रांगणापर्यंत साहित्य दिंडी काढली. त्यात विद्यार्थ्यांचा उत्साह प्रचंड होता. त्यांनी सादर केलेले ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गौरवगीत स्फूर्तिदायी ठरले. प्रभुणे म्हणाले, ‘‘कथाकथन करणे हा दुर्मिळ गुण आहे, तो उपजत असला पाहिजे. ५०-७० वर्षांपूर्वीची मराठीतील ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ ही गोष्ट अजूनही स्मरणात आहे, हीदेखील साहित्यांची किमया आहे. किशोर वयातच पुस्तकांशी गट्टी केली पाहिजे. मराठीमध्ये असंख्य विनोदी साहित्य आहे. ते मुलांनी वाचले पाहिजे.’’ संत ज्ञानेश्‍वर माउलींनी लहान वयातच ओव्या लिहिल्या, तुम्हीदेखील लिहू शकता, असा विश्‍वास मुलांमध्ये व्यक्त करून प्रभुणे यांनी ‘श्रीकांत’, ‘फास्टर फेणे’, ‘लच्छी’ अशा कादंबऱ्यांतील एकेक कथानक उलगडले. कथा- कादंबऱ्यांतून जीवन कसे घडते, यावर प्रकाश टाकला. 

कारगिल युद्धाची पार्श्‍वभूमी, युद्धवीरांच्या शौर्यगाथा, राष्ट्ररक्षणासाठी आहुती, लष्कराच्या विविध तळांना दिलेल्या भेटी याबाबत प्रभुदेसाई यांनी विचार मांडले. त्यांचे अनुभव उपस्थितांच्या मनावर खोलवर परिणाम करणारे ठरले. 

उपमहापौर मोरे म्हणाल्या, ‘‘मुलांनो, साहित्यात रमा. डिजिटल युगात पुस्तकांशी मैत्री करा. चांगली व्यक्ती म्हणून जीवन घडवा.’’ 

प्रा. जोशी म्हणाले, ‘‘बदलत्या जीवनशैलीमुळे पालक- मुलांमधला संवाद हरवत आहे. मुलांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी त्यांना साहित्य संमेलनासारखे व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. या संमेलनाच्या निमित्ताने शाळांमधूनच विद्यार्थ्यांना साहित्याचा अनुभव मिळणार आहे. मोठ्यांसाठी अखिल भारतीय साहित्य संमेलन, युवकांसाठी युवा साहित्य संमेलन होते. मात्र, बालकुमार साहित्य संमेलन भरविण्याचे काही कारणास्तव बंद झाले होते, ते पुन्हा सुरू केले. मुले तंत्रज्ञानात अडकत आहेत. ‘ब्ल्यू व्हेल’ खेळ मुलांसाठी जीवघेणा ठरला. माणसांचा वापर करून तंत्रज्ञानावर प्रेम करतोय. संवेदनशीलता हरवत आहे. यानिमित्ताने विद्यार्थ्यांची साहित्याशी नाळ जुळणार आहे. साहित्य कधीही नैराश्‍य येऊ देत नाही. त्यामुळेच पुस्तकांचे पंख लावा आणि उंच भरारी घ्या.’’

प्रा. दत्तात्रेय भालेराव यांनी स्वागताध्यक्ष अण्णा जाधव यांचा जीवनपट मांडला. मसाप भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. 

चले रे भोपळ्या...
एकीकडे मोठ्यांप्रमाणे लहान मुलेदेखील मोबाईल गेममध्ये गुंतून पडलेली दिसतात. अशातच शिशूवर्गातील चारवर्षीय विपुदा जतकर ही ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ कथाकथन सादर करते, तेव्हा उपस्थित पाहुणे आश्‍चर्यचकित झाले. तिला कविवर्य सुदाम भोरे यांनी पाचशे रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून दिले. कारगिलमधील सैनिक सोमनाथ शेळके यांचा मुलगा प्रियांशू शेळके याने स्केटिंगमध्ये सुवर्णपदक मिळविल्याबद्दल त्याला सन्मानित करण्यात आले.

सैन्यदलाला प्राधान्य द्या - प्रभुदेसाई
‘‘सैन्यदलासारखी धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रीय एकात्मता अन्यत्र कुठेही नाही. सैनिकांच्या कार्याचे भान प्रत्येकालाच असले पाहिजे. भारतीय लष्कर सुसंस्कृत असून लष्कर हेच राष्ट्र उभारणी करीत असते. विद्यार्थ्यांनी डॉक्‍टर, अभियांत्रिकीकडे वळण्यापेक्षा सैन्यदलाची प्राधान्याने निवड करावी,’’ असे आवाहन लक्ष्य फाउंडेशनच्या अनुराधा प्रभुदेसाई यांनी केले. त्या म्हणाल्या, ‘‘जवानांना धर्म, जात, प्रांत विसरून फक्त देश हा आपला वाटत असतो. सैनिकांमध्ये प्रचंड आशावाद असतो. ते स्वतःची आहुती देऊन देशाला विजय मिळवून देतात. अनेकदा त्यांच्या शौर्याचे प्रतीक असलेले पदक घेण्यासाठी ते जिवंत नसतात. समोर मृत्यू दिसत असतानाही धैर्याने शत्रूशी लढा देतात. अशी मानवाधिष्ठित राष्ट्रीयत्वाची संकल्पना प्रत्येक भारतीयाने स्वीकारणे गरजेचे आहे.’’ सैनिकांना पाठिंबा द्यायला आपण कमी पडत आहोत का, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. देशासाठी त्याग, बलिदान, समर्पणाचा अखंड जागर करणाऱ्या सैन्यासोबत देशाच्या नागरिकांनीही उभे राहण्याची गरज, प्रभुदेसाई यांनी अधोरेखित केली.

शिस्तबद्ध दिंडी 
अन्‌ संतांची वेशभूषा
 मोहननगर येथून सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडीला प्रारंभ
 ढोल-ताशांच्या गजरात शिस्तबद्ध बालकुमार दिंडी
 संत, महंत आणि महापुरुषांच्या वेशभूषेत विद्यार्थी
 विद्यार्थ्यांचे लेझीम पथक आकर्षण
 तुळसपूजनाने संमेलनाचे उद्‌घाटन
 अब्दागिरी, भगवे झेंडे, छत्र-चामर घेऊन विद्यार्थ्यांचा सहभाग 
 बालसाहित्याचे प्रदर्शन, विक्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com