बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता

बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता

पिंपरी - 
‘‘बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता..
हात त्याचा खरबुडा पण आईवानी होता..’’ 

कवी भरत दौंडकर यांची ही कविता. अशा एकापेक्षा एक सरस कवितांनी शुक्रवारी (ता. १०) बालकुमार साहित्य संमेलनात रंगत आणली.

विद्यार्थी आणि शिक्षकांनी कवी संमेलनाला उत्स्फूर्त दाद दिली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा विद्यालयाचे अध्यक्ष अण्णा जाधव, संचालक विजय जाधव, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे भोसरी शाखा अध्यक्ष मुरलीधर साठे, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, मुकुंद आवटे आदी उपस्थित होते. 

‘‘काय पूजता दगड, एक दिसाचा उत्सव... जिथे पूजतात आई, तिथे रोज महोत्सव..’’ ही आईची महती सांगणारी कविता कवी अनिल दीक्षित यांनी सादर केली. त्यांनी सादर केलेल्या ‘झिंग झिंग झिंगाट..’ या गीतावरील विडंबनाने एकच हशा पिकला. ‘‘तिच्या सपनांचा राजा तिला आज मिळणार..माझी लाडकी छकुली तिच्या सासरी जाणार..’’ ही बाप आणि मुलगी यांच्या नात्यावर आधारित कविता कवी राजेंद्र वाघ यांनी सादर करून भावनिक साद घातली. ग. दि. माडगूळकर यांची ‘माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरू.. जिंकू किंवा मरू..’ ही संदेशपर रचना विद्यार्थ्यांना भावली. कवितेतून बापाची व्यथा मांडताना दीपेश सुराणा म्हणाले, ‘‘जीवनाच्या लढाईत हरवून गेलो..बाळा, तुला वेळ देणे विसरून गेलो..’’ 

मराठीची महती कवितेतून मांडताना कवयित्री संगीता झिंजुरके म्हणाले, ‘‘शृंगार मराठीचा नववधुपरी..अनुस्वाराचे कुंकू भाळावरी..’’ रोहन शिंदे, अमृता इंदलकर, आविष्कार वैरागी, पायल शिरसाट, प्रतीक सूर्यवंशी, प्राची पाटील आदी विद्यार्थ्यांनी मान्यवर कवींच्या आणि स्वरचित कविता सादर केल्या.

बालपुढाऱ्याने केले उपस्थितांना थक्क
‘गोष्टीमधील गंमत जंमत’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. बालपुढारी घनश्‍याम दरवडे यांनी मुलांशी संवाद साधला. घनश्‍यामचे वय १४ वर्षांचे असताना शारीरिक वाढ न झाल्याने तो केवळ ८ ते ९ वर्षांचा वाटतो. टाकळी लोणार (जि. नगर) येथील असलेल्या घनश्‍याममध्ये असलेली हुशारी आणि राजकीय नेत्यांच्या लकबीत बोलण्याची क्षमता पाहून विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह उपस्थित साहित्यिकदेखील थक्क झाले. नोटाबंदी, शेतकरी कर्जमाफी, मराठी शाळांची स्थिती अशा विविध मुद्यांवर त्यांनी भाष्य केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com